आजोबा आणि नातवामधील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचे नाते उलगडणारा ‘आदि अनंत’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या टीझरमधून एका सुंदर कौटुंबिक कथेची झलक पाहायला मिळणार आहे. घरातील ज्येष्ठ व्यक्ती आणि नव्या पिढीतील सदस्य यांच्यातील नाते, त्यांच्यातील संवाद आणि एकमेकांबद्दलची काळजी या चित्रपटातून दाखवण्यात येणार आहे.
आजोबा हे केवळ कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्ती नसून, ते मुलांना चांगले संस्कार देणारे आणि संपूर्ण कुटुंबाला एकत्र ठेवणारे असतात. त्यांच्या सहवासातील गंमतीजमती, प्रेमाने केलेले लाड आणि आयुष्यभर लक्षात राहणाऱ्या आठवणी यांना या चित्रपटातून उजाळा मिळणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना या कथेत आपल्या कुटुंबातील नात्यांचे प्रतिबिंब पाहायला मिळेल. चित्रपटाचे दिग्दर्शक महेश लिमये म्हणाले की, आजोबा आणि नातवाचे नाते प्रेम, विश्वास आणि मायेने जोडलेले असते. या नात्यात लहानसहान हट्ट, कुरबुरी आणि भावनिक आधार असतो. ‘आदि अनंत’मधून हे नाते साध्या आणि सुंदर पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपट पाहताना प्रेक्षकांना हसू येईल, जुन्या आठवणी जाग्या होतील आणि आपल्या माणसांचे महत्त्वही जाणवेल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
निर्माते समीर हंपी आणि अनिकेत मराठे यांनीही हा चित्रपट प्रत्येक कुटुंबाला जवळचा वाटेल, असा विश्वास व्यक्त केला. भावनिक प्रसंगांसोबत मनोरंजनाची सांगड घालण्यात आली असून, संपूर्ण कुटुंबाला एकत्र बसून हा चित्रपट पाहता येईल. पॅनोरमा स्टुडिओज प्रस्तुत या चित्रपटाची निर्मिती कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, मुरलीधर छतवानी, समीर हंपी, महेश लिमये आणि अनिकेत मराठे यांनी केली आहे. रवींद्र औटी आणि दर्शन शाह सहनिर्मिती आहेत. महेश लिमये यांनी दिग्दर्शन केले असून, कथा, पटकथा आणि संवाद संकर्षण कऱ्हाडे यांचे आहेत. अशोक सराफ आणि संकर्षण कऱ्हाडे यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात सखी गोखले, वैदेही परशुरामी, कविता लाड, योगेश शिरसाट, आरव अहीर, श्रीरंग गोडबोले आणि गुरु ठाकूर हे कलाकारही दिसणार आहेत. येत्या १२ नोव्हेंबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.













