लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी सोमवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. तत्पूर्वी त्यांनी संविधान चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली. यानंतर, त्यांनी शक्तिप्रदर्शन करीत पक्षाचे कार्यकर्ते आणि अधिकाऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयाकडे कूच केले. या कार्यक्रमाला भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते, अधिकारी आणि मोठ्या संख्येने पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
मूळ अमरावतीचे असलेले डॉ. पोतदार नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस झाले आहेत. त्यांनी गडचिरोली व नागपूर जिल्ह्यात ग्रामीण भागात वैद्यकीय अधिकारी म्हणून सेवा दिली असून, १९९४ पासून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली.
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या राजिनाम्यामुळे पोटनिवडणूक होत असलेल्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदार संघात अनेक दावेदार होते. परंतु गेली ४० वर्षे अनेकदा अपयश येऊनही ग्रामीण भागात भाजपचे संघटन वाढविण्यासाठी त्यांनी सतत परिश्रम घेतले. भाजपच्या केंद्रीय समितीने त्यांच्या नावावर रविवारी रात्री शिक्कामोर्तब केले. आज सोमवारी त्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थित उमेदवारी अर्ज दाखल केला अन एका निष्ठावंताला न्याय मिळाल्याची भावना त्यांच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची पार्श्वभूमी असलेले डॉ. पोतदार यांनी १९९४ पासून राजकीय कारकीर्द सुरू केली. १९९५-१९९९ मधील लोकसभा व विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना युतीचा गावोगावी प्रचार केला. अमरावती जिल्ह्यातील खोलापूर येथे जन्मलेल्या डॉ. पोतदार यांनी कळमेश्वर हेच कर्मभूमी निवडली. २००२ मध्ये त्यांनी कळमेश्वर नगरपालिकेत ९ सदस्य निवडून आणत भाजप-शिवसेना युतीचे सत्ता आणली. त्यांना कळमेश्वर नगरपालिकेत नामनिर्देशित सदस्य म्हणून पक्षाने संधी दिली. उमेदवारी प्रक्रियेदरम्यान पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून आला आणि संपूर्ण परिसरात राजकीय हालचाली तीव्र झाल्या.











