पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेचा रौप्य महोत्सव
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : ‘पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्था’ गेल्या २५ वर्षांपासून जलसंधारणाच्या क्षेत्रात सातत्याने कार्यरत आहे. संस्थेने उभारलेल्या ‘तामसवाडा मॉडेल’ची दखल आज देशभर घेतली जात आहे. संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून नागपुरात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. दि. १७ मे २०२६ रोजी ‘नागपूर जलसंवाद-२०२६’ आणि दि. १८ मे २०२६ रोजी ‘जलक्रांती परिषद’ अशा दोन टप्प्यात हा रौप्य महोत्सव साजरा होणार आहे. यामध्ये देशभरातील दिग्गज जलतज्ज्ञ, पद्म पुरस्कार विजेते आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सहभागी होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली.
यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत गडकरी यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी आमदार चरणसिंग ठाकूर, आमदार उमेश खापरकर, पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष दत्ताजी जामदार, सचिव माधव कोटस्थाने, अनिल सांबरे, सुमंत पुणतांबेकर, मनोहरराव कुंभारे, सचिन कुलकर्णी, सुधीर दिवे, नितीन कुलकर्णी यांची उपस्थिती होती.
यावेळी गडकरी म्हणाले, ज्याप्रमाणे देशाने महामार्गांचे आणि वीज वितरणाचे जाळे उभारले आहे, त्याचप्रमाणे आता ‘जल वितरण जाळ्याची’ गरज आहे. अतिवृष्टी आणि पूरप्रवण भागांमधून मोठ्या कालव्यांच्या माध्यमातून पाणी दुष्काळग्रस्त भागांकडे वळवले पाहिजे. हे साध्य करण्यासाठी, केंद्र आणि राज्य सरकारांना मोठे प्रकल्प सुरू करावे लागतील, तसेच लोकप्रतिनिधी आणि गावकऱ्यांनीही जलसंधारणाला एक जनआंदोलन बनवावे लागेल.
गडकरी यांनी सांगितले की, पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी ही संस्था गेल्या २५ वर्षांपासून विदर्भात जलसंधारणाच्या क्षेत्रात कार्यरत आहे. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला ३५० हून अधिक तलाव बांधून दान करण्यात आले, ज्यामुळे आसपासच्या गावांमध्ये सिंचनाखालील शेतीची व्याप्ती वाढली आणि भूजल पातळी सुधारली. तलावांमधून काढलेल्या मातीचा वापर रस्ते बांधणीत करण्यात आला, ज्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यासही मदत झाली. त्यांनी स्पष्ट केले की, बुलढाणा जिल्ह्यात या मॉडेलचा वापर करून जलसंधारणाचे काम करण्यात आले असून, त्याचे सकारात्मक परिणाम दिसून आले आहेत.
रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या पहिल्या दिवशी, रविवार दि. १७ मे २०२६ रोजी दुपारी ४.०० वाजता सिव्हिल लाईन्स येथील डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात ‘नागपूर जलसंवाद २०२६’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ‘शेतकरी आत्महत्या मुक्त विदर्भासाठी जलसंधारण एक उपाय’ या मुख्य विषयावर यावेळी सखोल मंथन केले जाणार आहे. विदर्भातील पाणीटंचाई आणि सिंचनाच्या समस्येवर मात करून शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देण्याच्या उद्देशाने हा राष्ट्रीय स्तरावरील संवाद आयोजित करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ते स्वतः असतील. याप्रसंगी विशेष अतिथी म्हणून पद्मभूषण डॉ. अनिल प्रकाश जोशी (देहराडून), पद्मश्री उमाशंकरजी पांडे (चित्रकूट), पद्मश्री सेठपाल सिंग (सहारनपूर) हे दिग्गज उपस्थित राहून आपले मार्गदर्शन करतील. तसेच, केशोरव कृष्ण छत्रधारा (आसाम), संजय कश्यप (सेंटर फॉर वॉटर पीस), जलतज्ज्ञ स्वेडेव्हिनो नात्सो (नागालँड) आणि राज्याचे राज्यमंत्री अॅड. आशिष जयस्वाल व डॉ. पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी, सोमवार दि. १८ मे २०२६ रोजी सकाळी १०:०० वाजता रेशीमबाग येथील कविवर्य सुरेश भट सभागृहात ‘जलक्रांती परिषदे’चे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात संस्थेच्या २५ वर्षांच्या प्रवासाचा आढावा घेतला जाणार असून, विदर्भातील ‘तामसवाडा पॅटर्न’ सारख्या यशस्वी जलसंधारण प्रयोगांवर चर्चा होईल. या परिषदेला विशेष आकर्षण म्हणून प्रसिद्ध अभिनेते आणि ‘पाणी फाउंडेशन’चे संस्थापक आमिर खान, ‘नाम फाउंडेशन’चे अध्यक्ष नाना पाटेकर, आणि सचिव मकरंद अनासपुरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. याशिवाय राज्याचे मृदा व जलसंधारण मंत्री संजय राठोड, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख आणि गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांत बोकारे यांची देखील विशेष उपस्थिती लाभणार आहे. जलक्रांती परिषदेसाठी विदर्भातील शेतकरी व सरपंच मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.
दि. १८ मे रोजी मुख्य कार्यक्रम आटोपल्यावर दुपारी २.३० वाजता जलसंवर्धन आणि भूजल पुनर्भरण या विषयावर सखोल चिंतन होईल. तसेच ‘पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थे’ने गेल्या अडीच दशकांत केलेल्या कार्यावर चर्चा होईल, अशी माहिती गडकरी यांनी यावेळी दिली. या समृद्ध जल-अभियानात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष प्रफुल्ल दत्त जामदार आणि सचिव माधव कोटस्थाने यांनी केले आहे. या रौप्य महोत्सवी सोहळ्याच्या निमित्ताने ‘जलपर्व’, ‘जलक्रांती’, ‘कृषी कल्याण’ आणि ‘कॉरिडॉर्स ऑफ वॉटर सिक्युरिटी’ या महत्त्वपूर्ण पुस्तकांचे विमोचन मान्यवरांच्या हस्ते केले जाईल.









