तब्बल दोन दशकांनी लागला निकाल : न्यायालयाचे तपासातील त्रुटींवर कडक ताशेरे
लोकवाहिनी न्यूज,मुंबई : काँग्रेस नेते पवनराजे निंबाळकर व त्यांचे चालक समद काझी यांच्या हत्या प्रकरणाचा बहुप्रतिक्षित आणि बहुप्रलंबित निकाल अखेर लागला आहे. आज जाहीर करण्यात आलेल्या निकालात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार व माजी गृहराज्यमंत्री पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश सत्यनारायण ननंदर यांनी निकाल दिला. निकाल ऐकण्यासाठी पद्मसिंह पाटील मागील सुनावणीप्रमाणे आजही रुग्णवाहिकेेतून व्हिलचेअरवर न्यायालयात दाखल झाले होते. पवनराजेंचे सुपुत्र आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकरही यावेळी उपस्थित होते. ओमराजेनी ठाकरेंसोबत फारकत घेतल्याच्या पार्श्वभूमीवर येणारा हा निकाल अधिकच लक्षवेधी ठरला आहे.
निकालाचे वाचन करताना न्यायमूर्ती म्हणाले की, २००२ पासून पद्मसिंह आणि पवनराजे यांच्यात राजकीय दरी निर्माण झाली. पवनराजेंनी २००३ मध्ये आपल्या जिवाला धोका असल्याचे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. आम्ही १२७ साक्षीदारांच्या साक्ष तपासल्या. एक आरोपी पारसमल जैन माफीचा साक्षीदार झाला. खटल्याची भिस्त माफीच्या साक्षीदाराच्या साक्षिवर अवलंबून आहे. साक्षीपुरावांमध्ये खासदार ओमराजे निंबाळकर आणि धाराशिव येथील काही जणांचा समावेश आहे. जैन यांना १५ दिवस मारहाण करून जबाब घेतला, त्याची औषधं बंद केली, हे अयोग्य आहे. ८ सप्टेंबरला ताब्यात घेतल्यानंतर गुन्हे शाखेने जैन यांना २५ सप्टेंबरला अटक केली. या प्रकरणाचा तपास आणि एकूणच पाया ठिसूळ आहे. पोलिसांच्या तपासात विसंगती आहेत. जर माफीचा साक्षीदार हा भरवशाचा नसेल तर पुढे याची गरज नाही. विश्वास ठेवण्याजोगा आहे का यासाठी तपास लागतो, पुरावा बघावा लागतो, ॲनलिसिस करावं लागतं. माफीच्या साक्षीदाराने दिलेलं पुरावे होते त्यांचा तपास झाला. इतरांनी दिलेल्या माहितीनुसार क्रॉस व्हेरिफाय केलं. सर्वसाधारण साक्षीदार आणि माफीचा साक्षीदार यांच्यात फरक आहे. सदैव आरोपीच्या सुरक्षेचे रक्षण केले पाहिजे. इतर आरोपींचे कबुली जबाब घेतले गेले, पण काळजी घेतली गेली नाही.
सीबीआय उच्च न्यायालयात जाणार : अमित शहा
पवनराजे निंबाळकर हत्याकांड प्रकरणातील सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता झाल्यानंतर पीडित कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने पुढाकार घेतला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी थेट चर्चा करून या प्रकरणात उच्च न्यायालयात अपील करण्याची मागणी शिंदे यांनी लावून धरली. त्यानंतर अमित शाह यांनी सीबीआयला तात्काळ उच्च न्यायालयात अपील दाखल करण्याचे निर्देश दिल्याची माहिती शिंदे यांनी दिली.









