पुणे : विधान परिषदेच्या निवडणुकीत महायुतीच्या पाचही जागांवर विजय होईल आणि कुठेही बंडखोरी होणार नाही, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केला. काही ठिकाणी नाराज उमेदवारांनी अर्ज भरले असले, तरी हे अर्ज पक्षाच्या सूचनेनुसार डमी उमेदवारी म्हणून दाखल करण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
पुण्यातील विधानभवन येथे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी रवींद्र चव्हाण, मंत्री चंद्रकांत पाटील, राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
पदवीधर मतदारसंघातून डॉ. स्मिता जाधव, तर शिक्षक मतदारसंघातून कौस्तुभ गावडे यांनी अर्ज दाखल केला. चव्हाण यांनी सांगितले की, महायुतीने दोन्ही मतदारसंघांसाठी उच्चशिक्षित आणि अनुभवी उमेदवार दिले आहेत. डॉ. स्मिता जाधव यांच्याकडे कुलगुरू म्हणून काम करण्याचा अनुभव आहे. त्यामुळे शैक्षणिक संस्थांच्या अडचणी, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न तसेच सरकारशी संवाद साधण्याच्या बाबतीत त्यांचा अनुभव उपयोगी ठरेल, असे त्यांनी सांगितले.
कौस्तुभ गावडे हे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेत कार्यरत असून भाजपमध्ये अनेक वर्षांपासून काम करत आहेत. शिक्षण क्षेत्रातील अडचणी आणि शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी काम केले आहे. त्यामुळे दोन्ही उमेदवारांना मतदारसंघाचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा विश्वास चव्हाण यांनी व्यक्त केला.
महायुतीमधील काही नाराज नेत्यांनी स्वतंत्रपणे उमेदवारी अर्ज दाखल केल्याबाबत चव्हाण यांना विचारले असता, त्यांनी बंडखोरीची शक्यता फेटाळून लावली. काही ठिकाणी दाखल झालेले अर्ज हे डमी उमेदवारी अर्ज असून, ते पक्षानेच दाखल करण्यास सांगितले होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील, असा दावा चव्हाण यांनी केला.
नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर आणि पुणे या पदवीधर व शिक्षक मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांचा विजय निश्चित असल्याचेही त्यांनी सांगितले. महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मतदार नोंदणी मोहिमेत मोठ्या प्रमाणावर काम केले आहे.











