खा. अनिल बोंडे यांचे गौरवोद्गार
लोकवाहिनी न्यूज
अमरावती : कुमकुम मोहोड आणि यशदीप भोगे हे दोन्ही खेळाडू अमरावतीचा अभिमान आणि शान वाढविणारे ठरलेत, असे गौरवोद्गार खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी यावेळी काढले. जपानमध्ये झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतासाठी तिरंदाजीत दोन सुवर्णपदके आणि एका रौप्य पदकाची कमाई करणारी कुमकुम मोहोड आणि रौप्य पदक मिळवणारा यशदीप भोगे यांचे शहरात आगमन झाल्यावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने सत्कारचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी ते बोलत होते.
कुमकुम मोहोड आणि यशदीप भोगे हे खुल्या जीपमध्ये उभे होते. सोबत त्यांचे कुटुбіय देखील होते. या खेळाडूंची राजकमल चौकातून सुरू झालेली मिरवणूक जयस्तंभ चौक, मालवीय चौक मार्गे इर्विन चौक येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापर्यंत पोहोचली. ज्या शाळेत कुमकुम शिकते, त्या मणीभाई गुजराती हायस्कूलचे विद्यार्थी, श्री हनुमान व्यायाम प्रसार मंडळाचे खेळाडू तसेच शहरातील विविध क्रीडा संघटनांचे पदाधिकारी आणि क्रीडाप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. इर्विन चौक येथे पोहोचल्यानंतर कुमकुम मोहोड आणि यशदीप भोगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. त्यानंतर उपस्थितांनी ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष साजरा केला. आशियाई स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणाऱ्या महिला क्रिकेट संघातील भारती फुलमाळी हिचा देखील गौरव डॉ. बोंडे यांनी केला. ती यावेळी उपस्थित राहू शकली नाही. भारतीचे वडील श्रीकृष्णा फुलमाळी यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.












