लोकवाहिनी न्यूज:नागपूर : शहरातील दिवसेंदिवस उग्र रूप धारण करणारी वाहतूक कोंडी आणि रस्त्यांवर अनधिकृतपणे उभ्या राहणाऱ्या लोडिंग वाहनांमुळे निर्माण होणाऱ्या पार्किंगच्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, नागपूर शहरातर्फे वाहतूक पोलीस प्रशासनाला निवेदन सादर करण्यात आले.
शहराध्यक्ष अनिल अहिरकर यांच्या आणि शहर उपाध्यक्ष संतोष भुजाडे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिष्टमंडळाने वाहतूक विभागाचे अधिकारी लोहित मतानी व उमा धुमाळ यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन दिले. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा आणि गजबजलेल्या भागात नागरिकांना रोजच्या वाहतूक कोंडीचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
रस्त्यांच्या कडेला तासनतास उभ्या राहणाऱ्या लोडिंग गाड्यांमुळे रस्ते अरुंद होतात, परिणामी अपघातांचे प्रमाण वाढत आहे. अशा वाहनांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. लोडिंग आणि अनलोडिंग करणाऱ्या वाहनांसाठी शहरात स्वतंत्र पार्किंग झोन निश्चित करण्यात यावे, जेणेकरून मुख्य रस्त्यांवरील अडथळा दूर होईल. वाहतूक नियंत्रण यंत्रणा अधिक प्रभावी करून सिग्नल यंत्रणेत सुधारणा करण्याची गरज व्यक्त करण्यात आली.
नागपूरकरांना रोजच्या प्रवासात मनस्ताप सहन करावा लागत आहे. विशेषतः अवजड वाहने रस्त्यावरच उभी राहत असल्याने सामान्य वाहनचालकांना धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने यावर तात्काळ उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ टाकसाळे, शहर कार्याध्यक्ष श्रीकांत शिवणकर, नितीन डेंगे, सुरेश करणे, मनोज जरेल, लक्ष्मीकांत पांडे, सत्यम सोडगीर, आशिष खुबाळकर, शिवा जरेल, आशिष तुरके, सलाम शेख, किशोर मोरे, गोविंदराव सोमकुवर, प्रशिक सातपुते, साहिल भोस्कर यांच्यासह पक्षाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.








