लोकवाहिनी न्यूज:नागपूर : नागपूर महापालिकेत सत्तेत आल्यानंतर भाजपने मोठा गाजावाजा करून महापालिकेत महिला राज आल्याचे अभिमानाने सांगितले. समिती, झोन सभापतीपदी नगरसेविकांना संधी देत महिला राज सुरू केले, परंतु झोन सभापतीपदी निवड झालेल्या सभापतीऐवजी पतीच कारभार करीत असल्याने भाजपच्या महिला राजला घरातूनच सुरुंग लागत असल्याचे दिसत आहे.
निवडून आलेल्या नगरसेविकांऐवजी त्यांच्या पतीचा महापालिकेत दबदबा कायम असल्याचे दृश्य नागपूर महापालिकेत सहज दिसून येते. अक्षरशः बसपासारख्या एकच नगरसेविका असलेल्या पक्षापासून तर १०२ नगरसेवक असलेल्या भाजपमध्येही हे चित्र आहे. भाजप, बसपाच नव्हे तर ३४ सदस्य असलेली काँग्रेसही झोन सभापतीबाबत अपवाद नाही. सोमवारी नागपूर महापालिकेच्या लक्ष्मीनगर झोनची बैठक पार पडली. या झोनच्या सभापती लक्ष्मी यादव आहेत. त्यांनी बैठक सुरू केल्यानंतर थोड्याच वेळात त्यांचे पती माजी नगरसेवक मुन्ना यादव यांनीच या बैठकीतून अधिकाऱ्यांना दिशानिर्देश दिल्याचे काही नगरसेवकांनी सांगितले.
मुन्ना यादव यांनी यावेळी अधिकाऱ्यांना सूचना दिल्यात, शिवाय निवडून आलेल्या नवीन सदस्यांनाही मार्गदर्शन केले. त्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. यात काँग्रेसचे माजी नगरसेवकही मागे नाही. मंगळवारी झोनच्या सभापती काँग्रेसच्या सीमा डबरे यांनी घेतलेल्या बैठकीला त्यांचे पती अरुण डबरे उपस्थित राहिल्याने महिला नगरसेविकांच्या पतींचा वाढता हस्तक्षेप आता महापालिकेत चर्चेचा विषय ठरत आहे. काही महिला नगरसेविकांच्या पतींनी कार्यालयीन कामकाजात सक्रिय सहभाग घेतल्याचे प्रकार यापूर्वीही समोर आले आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रशासनातील पारदर्शकता आणि नियमांचे पालन याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
नागपूर महापालिकेची सत्ता चौथ्यांदा मिळवणाऱ्या सत्ताधारी भाजपने स्थायी समितीसह सर्व समित्यांची जबाबदारी महिलांच्या हाती सोपवली आहे. १५१ सदस्यीय महापालिकेत तब्बल ७८ नगरसेविकांना विविध समित्यांवर नियुक्त करत भाजपसह काँग्रेस, एमआयएम, इंडियन मुस्लिम लीग, शिवसेना (उबाठा), शिवसेना, बसपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने महिला सक्षमीकरणाच्या बाबत कुठेही मागे नाहीत असा संदेश दिला आहे.
भाजपने १६ सदस्यीय स्थायी समितीवर ११ महिला सदस्य दिल्या आहेत. परिवहन, जलप्रदाय, विधी, अग्निशमन, स्थापत्य, आरोग्य, कर आकारणी, गलिच्छ वस्ती सुधार आदी सर्व महत्त्वाच्या समित्यांच्या सभापतीपदी नगरसेविकांनाच संधी देण्यात आली आहे. स्थायी समितीमध्ये भाजपच्या शिवानी दाणी सभापती तर सदस्य म्हणून स्वीटी भिसोकर, प्रमिला गौर, विशाखा मोहोड, निरंजना पाटील, ममता ठाकूर, साधना बरडे, अभिजीत राजगिरै, शितल रारोकर, सानवी शेंडे, मानसी सिमले यांना संधी दिली आहे. तर काँग्रेसकडून चार सदस्य स्थायी समितीत आहेत, परंतु केवळ मेरिटेला उसरे या नगरसेविकेला संधी दिली.








