नागपूर पदवीधरमध्ये लागणार चांगलाच कस
प्रसन्न जकाते
नागपूर : पदवीधर मतदारसंघाची निवडणूक जेव्हा केवळ काँग्रेस विरुद्ध भाजप अशी राहिलेली नाही. या निवडणुकीत खरी रंगत वाढली आहे, तो भाजपाच्या घरातील नाराजीने! भाजपने माजी आमदार सुधाकर कोहळे यांना मैदानात उतरवले आणि माजी आमदार प्रा. अनिल सोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल करून थेट पक्षालाच आव्हान दिले. त्यामुळे विरोधकांपेक्षा भाजसमोरचा खरा पेच आता घरतूनच निर्माण झाला आहे.
काँग्रेसकडून अभिजित वंजारी पुन्हा नशीब आजमावत आहेत. वंचित बहुजन आघाडीचे मंगेश वानखेडे, बसपाचे संजय शूल, प्रा. नीतेश कराळे, संविधाना विचारसरणीचे ॲड. रमण सेनाड यांच्यासह अन्य उमेदवार मैदानात आहेत. त्यामुळे निवडणूक बहुरंगी आहे, मात्र सोले यांनी माघार घेतली नाही, तर ही लढत थेट तिरंगी समीकरणात अडकू शकते.
याच ठिकाणी भाजपच्या जुन्या जखमेवर पुन्हा हात पडतो. ‘गड’ बाहेरच्यांनी नाही, घरच्यांनी हादरवला तर? नागपूर पदवीधर मतदारसंघ हा भाजपसाठी प्रतिष्ठेचा मतदारसंघ. या गडावर पक्षाला विरोधकांपेक्षा अंतर्गत मतविभाजनाचीच अधिक चिंता असते. गेल्या निवडणुकीतही पक्षाच्या उमेदवारावरून नाराजीची चर्चा रंगली आणि त्याचा परिणाम भाजपच्या उमेदवाराला भोगावा लागला.
आता पुन्हा तसाच प्रसंग उभा राहण्याची चिन्हे दिसत आहेत. काँग्रेस, वंचित, बसपा किंवा अपक्ष उमेदवार किती तडफेने लढतात, यापेक्षा भाजपची मतांची बेरीज किती तुटते, हा या निवडणुकीतील निर्णायक प्रश्न ठरू शकतो. कारण पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत विजयासाठी केवळ पक्षाची पारंपरिक ताकद पुरेशी नसते. उमेदवारांची वैयक्तिक प्रतिमा, संघटन, संपर्क आणि मतांचे सूक्ष्म ठ य व र्ष पा प न ही तितकेच महत्त्वाचे असते. त्यामुळे एकाच पक्षाशी संबंधित दोन चेहरे समोरासमोर आले, तर समीकरणे क्षणात बदलू शकतात.
सोले यांना पक्षाने दिले कमी की भरभरून हा प्रश्न आहे? प्रा. अनिल सोले यांच्या राजकीय प्रवासाकडे पाहिले तर भाजपने त्यांना काही कमी दिले, असे नाही. महापालिकेतील सत्ता पक्ष नेत्याचे महत्त्वाचे पद, नागपूरचे महापौरपद, शहराध्यक्षपद, भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्षपद, पदवीधर मतदारसंघांतून विधान परिषदेवर जाण्याची संधी देत भाजपाने सोले यांच्या राजकीय कारकिर्दीला अनेकदा बल दिले.
त्यामुळे आता प्रश्न केवळ उमेदवाराचा नाही. प्रश्न आहे तो पक्षाच्या शिस्तीचा! भाजपमध्ये निर्णय झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी पक्षाच्या निर्णयासोबत उभे राहण्याची परंपरा आहे. गेल्याप्रकरणी ही शिस्त प्राध्यापक महोदयांनी पाळली. यंदा मात्र उमेदवारी नकारल्यानंतर सोले यांनी
बंडाचे पाऊल उचलले आहे. त्यामुळे त्यांच्या निर्णयाकडे केवळ वैयक्तिक नाराजी म्हणून पाहायचे की पक्षाच्या निर्णयप्रक्रियेला दिलेले आव्हान म्हणून, यावर भाजपच्या राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
‘वरच्या नेत्यांना सगळं माहिती आहे…’
उमेदवारी अर्ज दाखल करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना आपली भूमिका माहिती होती, असा उल्लेख सोले यांनी केला. हे विधान आता राजकीय चर्चेचे केंद्र बनले आहे, जर पक्षातील प्रमुख नेत्यांना त्यांची भूमिका माहिती होती, तर मग बंडखोरीचा हा निर्णय नेमका कोणत्या राजकीय गणितातून आला आणि जर पक्षनेतृत्वाने परवानगी दिलेली नसेल, तर पक्षाचा निर्णय झुगारून
निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा संदेश नेमका काय घेतला जाणार? याच प्रश्नांची उत्तरे आता भाजपच्या राजकारणात शोधली जात आहेत. अनिल सोले यांच्यासाठी गडकरींची जवळीक किती उपयोगी, किती धोकादायक, हे देखील पुन्हा चर्चेत आले आहे. प्रा. अनिल सोले हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या जवळच्या वर्तुळातील नेते म्हणून ओळखले जातात. गडकरींच्या सांस्कृतिक महोत्सवाच्या आयोजनाचा आत्मा म्हणजे अनिल सोले. राजकारणात जवळीक ही ताकद असते, पण तीच जवळीक पक्षशिस्तीच्या कसोटीवर प्रश्नचिन्हही ठरू शकते. गडकरींच्या विश्वासातील नेता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराविरुद्ध मैदानात उतरला, तर त्याचा राजकीय अर्थ काय काढला जाणार? हा प्रश्न केवळ सोले यांच्यासाठी नाही; तो सगळ्यांपुढेच उभा राहतो.
भाजपमध्ये व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा, हीच भूमिका सातत्याने मांडली जाते. त्यामुळे एखाद्या नेत्याची वैयक्तिक ताकद पक्षाच्या अधिकृत निर्णयापेक्षा वरचढ ठरू लागली, तर भविष्यात त्याचे परिणाम दूरगामी असू शकतात. गेल्या निवडणुकीतही प्रा. अनिल सोले पदवीधर मतदारसंघातून इच्छुक होते. मात्र पक्षाने माजी महापौर संदीप जोशी यांना संधी दिली. त्यानंतर पक्षांतर्गत समीकरणांवरून विविध चर्चा रंगल्या. जोशी यांचा पराभव झाला. पुढे ते विधान परिषदेवर गेले, तर सोले यांची राजकीय वाटचाल काही काळ तुलनेने साइडट्रॅकवर पडली.
आता इतिहास पुन्हा एकदा वेगळ्या रूपात समोर उभा ठाकला आहे. दयाशंकर तिवारी, संदीप जोशी, प्रवीण दटके, कृष्णा खोपडे, मोहन मते, डॉ. परिणय फुके, सुधाकर कोहोळे यांच्यासह भाजपाचे अनेक नेते पक्षाच्या अधिकृत निर्णयासोबत उभे आहेत. म्हणूनच भाजपच्या राजकारणात सध्या एकच संदेश दिसतो ‘ट्रॅक पक्षाचा; गादीही पक्षाची!’ या ट्रॅकवरून सोले यांनी ‘रंगसाइड’ घेतले, तर त्याचा परिणाम केवळ या निवडणुकीपुरता मर्यादित राहणार का, हा खरा प्रश्न आहे. सोले यांनी माघार घेतली, तर भाजपाला मोठा दिलासा मिळेल. पण ते मैदानात ठाम राहिले आणि मतांचे विभाजन झाले, तर काँग्रेससह विरोधकांसाठी ही निवडणूक अचानक खुळी होऊ शकते आणि मग प्रश्न फक्त ‘कोहोळे विरुद्ध वंजारी’ एवढाच राहणार नाही. प्रश्न असेल भाजपच्या मतदारांपुढे की, खरा उमेदवार कोण? भाजपची मतं कोणाकडे जाणार?
राजकारणात कधी कधी विरोधक गड जिंकत नाहीत… गडातील दरवाजा आतून उघडला जातो! नागपूर पदवीधर मतदारसंघात यंदा तो दरवाजा कोण उघडतो आणि कोण बंद करतो, यावरच भाजपच्या गडाचे भवितव्य ठरणार आहे. पदवीधर मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून गेल्या निवडणुकीपर्यंत येथे भाजपचेच कमळ फुलले आहे. सोले यांना सोन्याचा मुलामा दिल्यानंतरही ते जर बंडखोरी करीत असतील तर हा सोले यांचा गुणदोष आहे की, नागपुरातील नेतृत्वाचा असा प्रश्न आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बंडखोरीच्या कृत्यामुळे भाजपची कातडी ‘सोले’ असा प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.
मतदारांपुढे की, खरा उमेदवार कोण? भाजपची मतं कोणाकडे जाणार?
राजकारणात कधी कधी विरोधक गड जिंकत नाहीत… गडातील दरवाजा आतून उघडला जातो! नागपूर पदवीधर मतदारसंघात यंदा तो दरवाजा कोण उघडतो आणि कोण बंद करतो, यावरच भाजपच्या गडाचे भवितव्य ठरणार आहे. पदवीधर मतदारसंघाची स्थापना झाल्यापासून गेल्या निवडणुकीपर्यंत येथे भाजपचेच कमळ फुलले आहे. सोले यांना सोन्याचा मुलामा दिल्यानंतरही ते जर बंडखोरी करीत असतील तर हा सोले यांचा गुणदोष आहे की, नागपुरातील नेतृत्वाचा असा प्रश्न आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बंडखोरीच्या कृत्यामुळे भाजपची कातडी ‘सोले’ असा प्रकार घडणार नाही, याची काळजी घ्यावी लागणार आहे.










