शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा
लोकवाहिनी न्यूज
सातारा : आजपासून महाराष्ट्रात शिवराज सिंह चौहान आणि पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वात १२ रुपये ३५ पैशांनी कांद्याची खरेदी सुरू होत आहे. हा कांद्याच्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा ठरेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी साताऱ्यातील कार्यक्रमादरम्यान सांगितले.
गेल्या काही महिन्यांपासून राज्यात कांद्याचे दर खूप कोसळले आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांचा हवालदिल झाला आहे. सीमावर्ती देशांमधील युद्ध, निर्यात अडथळे आणि नैसर्गिक आपत्ती यामुळे कांद्याची बाजारातील मागणी कमी झाली आहे, तर उत्पादनाचा खर्चही शेतकऱ्यांच्या तोंडाला गेला आहे. परिणामी, अनेक शेतकरी आपले कांदे वाया जाऊ न देण्यासाठी आर्थिक संकटात सापडले आहेत. यावर उपाय म्हणून मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्य व केंद्र सरकारकडे शेतकऱ्यांसाठी तातडीच्या कृतीची मागणी केली. त्यांनी सांगितले की, शेतकऱ्यांना किमान २ ते ३ हजार रुपये प्रति क्विंटल दराने कांदा विकता यावा आणि त्यासोबत प्रति क्विंटल १५०० रुपये अनुदान देखील दिले जावे. तसेच, नाफेडमार्फत तातडीने कांद्याची खरेदी सुरू करावी, तसेच केंद्र सरकारच्या सहकार्याने दीर्घकालीन स्थिर निर्यात धोरण लागू करावे.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काही शेतकरी आज इतक्या अडचणीत आहेत की, कांद्याला एक रुपये भाव मिळत असल्याने तो फेकून द्यायला ही लागले आहेत. यावर उपाय म्हणून आम्ही केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आजपासून महाराष्ट्रात कांद्याची खरेदी प्रति किलो १२ रुपये ३५ पैशांनी सुरू झाली आहे. ही पावले शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरणार आहेत. सातारा येथे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्याचे अनावरण कार्यक्रम आणि प्रधानमंत्री आवास योजनेच्या लोकार्पण सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर, ही घोषणा केली गेली. यावेळी मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले, आमदार अमित गोरखे, आमदार सुनील कांबळे, आदी मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, भारताला पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनवायची असल्यास फक्त बाजार भावावर अवलंबून राहता येणार नाही. देशाच्या आर्थिक विकासासाठी महिलांना उद्योग, शेती आणि व्यवसाय क्षेत्रात सक्रिय सहभाग असणे आवश्यक आहे. राज्यातील अर्थकारणाबाबत बोलताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले की, जागतिक परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय युद्धामुळे निर्यात अडचणी निर्माण झाल्या आहेत, परंतु आजही कोणतीही निर्यात बंदी लागू केलेली नाही. मुंबई बंदरात शेतीमाल मोठ्या प्रमाणात साठला आहे, त्यामुळे या परिस्थितीचा सामना करत, सरकार शेतकऱ्यांचे हित राखण्याचे प्रयत्न करत आहे. या घोषणेनंतर शेतकऱ्यांमध्ये आर्थिक संकटाचे काहीसे निवारण होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मुख्यमंत्री आणि केंद्र सरकारच्या प्रयत्नांमुळे शेतकऱ्यांना फक्त तातडीच्या मदतीतच नाही, तर भविष्यातील निर्यात धोरणांद्वारेही आर्थिक स्थैर्य मिळण्याची शक्यता आहे. ■









