लोकवाहिनी न्यूज
अकोला : नीट-युजी २०२६ पेपरफूट प्रकरणी देशभरातील अनेक शहरांतून आरोपींना अटक झाल्यानंतर, या प्रकरणाचे धागेदोरे आता अकोल्यापर्यंत पोहोचले असून, येथील प्रसिद्ध आरसीसी अर्थात रेणुकाई कोचिंग क्लासेसच्या एका शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्याने प्रचंड खळबळ उडाली आहे. जनमानसात या क्लासेसविरुद्ध रोष प्रकट होत आहे. सिव्हिल लाईन पोलिस या प्रकरणात पुढील तपास करीत असून, त्यात अकोल्यातून नेमकी काय माहिती समोर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नीट पेपरफूट प्रकरणात सीबीआयने आरसीसीचे संचालक शिवराज मोटगावकर यांची चौकशी केल्यानंतर चौकशीची सुई अकोल्याच्या दिशेने वळली आहे. वंचित बहुजन आघाडी आणि सम्यक विद्यार्थी आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी तोष्णीवाल लेआउटमधील आरसीसी शाखेवर धडक देत जोरदार निदर्शने केली. यावेळी आंदोलकांनी संबंधित शिक्षकाला ताब्यात घेऊन थेट सिव्हिल लाईन पोलिस ठाण्यात नेले. आंदोलकांनी आरसीसीची अकोल्यातील शाखा तातडीने सील करण्याची मागणी केली आहे. संस्थेचा परवाना, आर्थिक व्यवहार आणि संचालकांचे संबंध यांची सखोल चौकशी व्हावी, अशी भूमिकाही घेण्यात आली आहे. जिल्हाध्यक्ष धीरज इंगळे यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलकांनी, पुराव्यांशी छेडछाड होऊ नये म्हणून, तपास पूर्ण होईपर्यंत या शाखेचे सर्व शैक्षणिक उपक्रम बंद ठेवण्याची मागणी केली आहे. यापूर्वी मनसे विद्यार्थी आघाडी, संभाजी ब्रिगेड आणि सम्राट अशोक सेना यांसारख्या संघटनांनीही या क्लासेसवर बंदी घालण्याची मागणी केली होती.











