मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रकल्पाला गती
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : देशातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रकल्पांपैकी एक असलेल्या मुंबई-अहमदाबाद उच्चगती रेल्वे प्रकल्पाला महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात अंबेसरी परिसरात उभारण्यात येत असलेल्या तिसऱ्या पर्वतीय बोगद्याचे उत्खनन पूर्ण झाले असून, ब्रेकथ्रू यशस्वीरीत्या साध्य करण्यात आला आहे. या यशामुळे संपूर्ण मार्गिकेच्या बांधकामाला अधिक गती मिळणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
हा बोगदा सुमारे ४१७ मीटर लांबीचा असून, त्याची रुंदी १४.४ मीटर आहे. या बोगद्याची रचना अप आणि डाऊन अशा दोन्ही बुलेट ट्रेन मार्गिकांसाठी करण्यात आली आहे. वापी-बोईसर दरम्यानच्या महत्त्वाच्या जोडणीचा भाग म्हणून या बोगद्याचे महत्त्व अत्यंत मोठे मानले जात आहे.
उत्खननाचे काम दोन्ही बाजूंनी नियंत्रित ड्रिलिंग आणि ब्लास्टिंग तंत्राचा वापर करून करण्यात आले. या प्रक्रियेदरम्यान, भूगर्भीय स्थैर्य आणि सुरक्षिततेला प्राधान्य देण्यात आले. बोगद्याच्या बांधकामादरम्यान कोणतीही भू-संरचनात्मक अडचण निर्माण होऊ नये, यासाठी आधुनिक मॉनिटरिंग प्रणालींचा वापर करण्यात आला. यात सिस्मोग्राफ, थ्रीडी टार्गेट्स, स्ट्रेन गेजेस आणि सरफेस सेटलमेंट पॉइंट्स यांचा समावेश होता. कामकाजादरम्यान, परिसरातील कंपन, मातीतील बदल आणि संरचनात्मक स्थिरता यावर सतत लक्ष ठेवण्यात आले. यामुळे प्रकल्प सुरक्षित आणि नियोजित पद्धतीने पूर्ण करण्यात मदत झाली.
कामगारांच्या सुरक्षेसाठी बोगद्यामध्ये प्रभावी वायुवीजन व्यवस्था, अग्निसुरक्षा उपाययोजना आणि नियंत्रित प्रवेश व्यवस्था करण्यात आली होती. तसेच भू-तांत्रिक निरीक्षण प्रणालीद्वारे सतत देखरेख ठेवण्यात आली. प्रकल्प अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, या सर्व उपायांमुळे उत्खनन प्रक्रिया सुरक्षित आणि नियोजनबद्धरीत्या पार पडली. गेल्या काही महिन्यांत महाराष्ट्रातील बुलेट ट्रेन प्रकल्पात बोगद्यांच्या कामाला वेग आला असून, हा तिसरा पर्वतीय बोगदा पूर्ण झाला आहे. याआधी एमटी-८, एमटी-५ आणि एमटी-६ या बोगद्यांचे ब्रेकथ्रू यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आले होते. आता एमटी-७ च्या यशस्वी पूर्ततेमुळे गेल्या ५ महिन्यांत महाराष्ट्रातील तीन महत्त्वाचे पर्वतीय बोगदे पूर्ण झाले आहेत.









