चित्रपटाचे दिग्दर्शक प्रवीण तरडे यांची माहिती
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : २०१३ साली प्रदर्शित झालेल्या सुपरहिट ‘देऊळ बंद’ या चित्रपटाने मराठी प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत बॉक्स ऑफिसवर मोठा गाजावाजा केला होता. श्रद्धा विरुद्ध विज्ञान यांचा संगम असलेल्या या चित्रपटाने त्या काळात प्रचंड लोकप्रियता मिळवली होती. तब्बल ११ वर्षांनंतर प्रदर्शित झालेल्या ‘देऊळ बंद २’ या बहुचर्चित सिक्वेलनेही प्रदर्शित होताच मराठी चित्रपटसृष्टीत ब्लॉकबस्टर एन्ट्री करत प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळवला आहे. अवघ्या २० दिवसात चित्रपटाने ७५ कोटींच्या वर कमाई केली असून, नफ्याचे पैसे आत्महत्येग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी दिला जाईल, अशी ग्वाही वटवृक्ष इंटरटेनमेंट निर्मित ‘देऊळ बंद २’ चे लेखक आणि दिग्दर्शक प्रविण विठ्ठल तरडे यांनी येथे बोलताना दिली.
राज्यातील अनेक चित्रपटगृहांमध्ये पहिल्या दिवसापासून शो हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर तरडे यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत चित्रपटाबद्दल माहिती दिली. ते म्हणाले, पुणे, पिंपरी-चिंचवड, मुंबई, नाशिक, पश्चिम महाराष्ट्र, नागपूर, जळगाव, विदर्भ आणि मराठवाड्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ‘देऊळ बंद २’ची प्रचंड क्रेझ पाहायला मिळत आहे. या भागातील अनेक थिएटरचे सर्व शो हाऊसफुल्ल होत असून, तिकीट खिडक्यांवर गर्दी होत आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी ३.०५ कोटींची धमाकेदार कमाई करून नवा इतिहास रचला आणि फक्त २० दिवसात ७५ कोटींपेक्षा जास्त कमाईचा विक्रम करत घोडदौड सुरू आहे. मी सांगितल्यानुसार चित्रपटाच्या कमाईचा पैसा आत्महत्येग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी वापरला जाईल.
हा पैसा गरजू मुलांपर्यंत जावा यासाठी शेतकऱ्यांसाठी कार्य करणाऱ्या संघटनांचा यात सहभाग आहे. त्यांनी सांगितलेल्या मुलांना मदत केली जाईल. विदर्भात शेतकरी आत्महत्येचे प्रमाण सर्वाधिक असून, चित्रपटाच्या कमाईतून मदत केली जाणार आहे. त्यामुळे विदर्भातील प्रत्येकाने हा चित्रपट बघावा जेणेकरून विदर्भातील गरजू मुलांना जास्तीत जास्त मदत केली जाईल, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
सोशल मीडियावर ‘देऊळ बंद २’ची जोरदार चर्चा रंगली असून, प्रेक्षकांनी चित्रपटातील संवाद, दमदार कथानक, भावनिक प्रसंग, संगीत आणि कलाकारांच्या अभिनयाचे भरभरून कौतुक केले असून महाराष्ट्रातील छोट्या गावांपासून ते मोठ्या शहरांमधील मल्टिप्लेक्सपर्यंत सर्वत्र प्रेक्षकांना आकर्षित केले आहे. ग्रामीण भागातील शेतकरी बांधवांपासून ते शहरी भागातील तरुण, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांपर्यंत समाजातील सर्व स्तरांतील प्रेक्षक सहकुटुंब या चित्रपटाला गर्दी करत आहेत. वाढत्या मागणीमुळे राज्यभरातील सिंगल स्क्रीन आणि मल्टिप्लेक्समध्ये चित्रपटासाठी ‘हाऊसफुल्ल’चे बोर्ड झळकत असून, तिसऱ्या आठवड्यातही बॉक्स ऑफिसवर चित्रपटाची कामगिरी भक्कम सुरू आहे.











