उभ्या कंटेनरवर कारची धडक, एकाचाही जीव वाचवता आला नाही
लोकवाहिनी न्यूज
चंद्रपूर : समृद्धी महामार्गावर रविवारी सकाळी झालेल्या भीषण अपघातात चंद्रपूर शहरातील एकाच कुटुंबातील पाच जणांचा घटनास्थळी मृत्यू झाला. धामणगाव रेल्वे तालुक्यातील समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक १०६ जवळ भरधाव कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरवर आदळल्याने हा अपघात घडला. या दुर्घटनेमुळे चंद्रपूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चंद्रपूर शहरातील बाबुपेठ परिसरातील डी.एड. कॉलेजजवळ राहणारे जीवने कुटुंब रविवारी अकोला येथे एका कौटुंबिक कार्यक्रमासाठी वंगणार कारने निघाले होते. धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावरील चॅनेल क्रमांक १०६ परिसरात त्यांच्या कारने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला भरधाव वेगात जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की कारचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. या भीषण अपघातात कारमधील सर्व प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला.
मृतांमध्ये आरती जीवने (४०), भास्कर जीवने (५७), महादेव जीवने (४२), लता जीवने (४३) आणि त्रिशा जीवने (१२) (सर्व रा. डी.एड. कॉलेजजवळ, बाबुपेठ, चंद्रपूर) यांचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलीस, स्थानिक पोलीस, रुग्णवाहिका आणि आपत्कालीन बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. कारमध्ये अडकलेल्या मृतदेहांना मोठ्या प्रयत्नांनी बाहेर काढण्यात आले. त्यानंतर सर्व मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आले.
प्राथमिक तपासात भरधाव वेगामुळे वाहनावरील नियंत्रण सुटून कार उभ्या कंटेनरवर आदळल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मात्र, अपघाताचे नेमके कारण, कंटेनरची उभी करण्याची परिस्थिती, रस्त्यावरील सुरक्षिततेचे नियम पाळण्यात आले होते का, तसेच इतर तांत्रिक बाबींचा सखोल तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली. या दुर्घटनेची माहिती चंद्रपूरमध्ये पोहोचताच बाबुपेठ परिसरात शोककळा पसरली. एकाच कुटुंबातील पाच जणांच्या दुर्दैवी मृत्यू झाल्याने परिसरातील नागरिकांनी हळहळ व्यक्त केली आहे.
रिवारी चंद्रपूर येथील जीवने कुटुंबातील पाच जण कारने अकोल्याकडे जात होते. समृद्धी महामार्गावर धामणगाव रेल्वेजवळ चॅनेल क्रमांक १०६ परिसरात रस्त्याच्या कडेला एक कंटेनर उभा होता. याचवेळी कारचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कार भरधाव वेगाने जाऊन थेट उभ्या कंटेनरच्या मागील बाजूस धडकली. धडक इतकी भीषण होती की, कारचा दर्शनी भाग पूर्णपणे कंटेनरच्या आतमध्ये शिरून अक्षरश: चक्काचूर झाला आणि कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात एका बारा वर्षीय मुलीला देखील आपले प्राण गमावावे लागले.
घटनेची माहिती मिळताच दत्लापूर पोलीस, महामार्ग पोलीस तसेच जिल्हा वाहतूक पोलीस स्थानिकंच्या मदतीने बचावकार्य राबविण्यात आले. मात्र, अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की, कारमधील कोणालाही वाचविणे शक्य झाले नाही. मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी धामणगाव येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले आहेत. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस अधिक तपास करत आहेत.
समृद्धी महामार्गामुळे नागपूर ते मुंबई प्रवासाला लागणारा वेळ कमालीचा कमी झाला असला, तरी वाढते अपघात चिंतेचा विषय बनला आहे. यावर अभ्यासही करण्यात आला आहे, त्यात ‘महामार्ग संमोहन’ (Highway Hypnosis) हेही एक कारण असल्याचे समोर आले आहे. कोणत्याही अडथळ्याविना महामार्गावर गाडी सरळ एकाच दिशेने धावत असते, तेव्हा चालकाच्या शरीराची हालचाल स्थिर होते, चालकाचा मेंदू प्रतिक्रियेसाठी सक्रिय नसतो. त्याला ‘महामार्ग संमोहन’ असे म्हणतात.
आत्तापर्यंत ४४४ मृत्यू
समृद्धी महामार्गावर ११ डिसेंबर २०२२ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत घडलेल्या एकूण ४११ अपघातांमध्ये ४४४ जणांचा मृत्यू झाला. ही आकडेवारी माहिती अधिकारातून प्राप्त झाली आहे. १५ ऑक्टोबर २०२३ रोजी बुलढाणा जिल्ह्यातील सैलानी बाबा यांचे दर्शन घेऊन शिर्डी येथे जात असलेल्या भाविकांची टेम्पो ट्रॅव्हलर गाडी उभ्या ट्रकवर धडकली होती. त्यात बारा जणांचा जागीच मृत्यू झाला होता. अशाच प्रकारचा अपघात रविवारी घडला आहे.











