संरक्षण मंत्रालयाची १.१० लाख कोटींच्या खरेदीला मंजुरी
लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : लष्कराची एकूण लढाऊ क्षमता वाढवण्यासाठी, संरक्षण मंत्रालयाने सोमवारी तिन्ही दलांसाठी रडार, प्रगत हलकी हेलिकॉप्टर्स आणि मेकॅनिकल माइन लेयर्स (सुरंग पेरणी यंत्रणा) यांसारख्या लष्करी साधनसामग्रीच्या खरेदीला मंजुरी दिली. या खरेदीचा खर्च १.१० लाख कोटी रुपये आहे.
प्रगत हलकी हेलिकॉप्टर्स भारतीय लष्कर आणि भारतीय वायुदलासाठी सर्व प्रकारच्या भूप्रदेशांवर आणि परिचालन परिस्थितीमध्ये गुंतागुंतीच्या मोहिमा पार पाडतील. ट्रॉल टॅक्स आणि ब्रिज सिस्टमचा वापर विविध भूप्रदेशांमधील मोहिमांंदरम्यान लढाऊ तुकड्यांना मार्गक्रमण करण्यासाठी केला जाईल, असे मंत्रालयाने म्हटले आहे.
भारतीय नौदलासाठी ‘अरुध्रा’ रडारची खरेदी तसेच मरीन गॅस टर्बाइन्सची रचना, विकास आणि त्यानंतरच्या खरेदीसाठी गरजेचीस्वीकृती देण्यात आली. विविध नौदल हवाई तळावरील सध्याच्या हवाई मार्ग निगराणी रडारच्या जागी अरुध्रा रडार बसवले जातील आणि युद्धनौका प्रनोदन प्रणाली असलेल्या एमजीटीमुळे परदेशी पुरवठादारांवरील अवलंबित्व कमी होण्याची अपेक्षा आहे.
भारतीय हवाई दलासाठी, लढाऊ विमाने, वाहतूक विमाने आणि हेलिकॉप्टर यांची युद्धक्षमता वाढवण्यासाठी विविध प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. मंत्रालयाच्या माहितीनुसार, ग्राउंड-बेस्ड मल्टि-पर्पज जॅमर खरेदी करण्यासाठी आणि डिफेंस फोर्सेस सिक्युअर अॅक्सेस कार्ड प्रणाली स्थापित करण्यासाठी मंजुरी देण्यात आली.
एका निवेदनात म्हटले आहे की, जीबीएमपीजे शत्रूच्या रडारवर प्रभावी जॅमिंग करेल. एकूण मंजूर केलेल्या प्रस्तावांपैकी सुमारे ९८ टक्के खरेदी भारतीय उद्योजनाकडून केली जाईल, असेही त्यात नमूद आहे.













