धर्मादाय आयुक्तांकडून स्पष्टीकरण अर्ज निकाली
जुन्या आदेशात बदलाची गरज नाही
लोकवाहिनी न्यूज
नागपूर: डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या (दीक्षाभूमी) अध्यक्षपदावरून निर्माण झालेल्या वादावर धर्मादाय आयुक्तांच्या आदेशामुळे पडदा पडला आहे. धर्मादाय आयुक्तांनी दीक्षाभूमी ट्रस्टचा स्पष्टीकरण अर्ज निकाली काढताना, कार्यालयीन अधिकृत नोंदिनुसार भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई हेच समितीचे अधिकृत अध्यक्ष असल्याचे स्पष्ट केले आहे.
तसेच यापूर्वी कलम ४१-अ अंतर्गत २० फेब्रुवारी २०२६ रोजी पारित केलेल्या आदेशात कोणतीही बदल करण्याची आवश्यकता नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे, अशी माहिती भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांनी प्रसार माध्यमांना दिली.
डॉ. राजेंद्र गवई व इतरांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्या संदर्भात धर्मादाय आयुक्तांकडे स्पष्टीकरण अर्ज दाखल केला होता. या अर्जावर सुनावणी घेतल्यानंतर धर्मादाय आयुक्तांनी तो निकाली काढला. यावेळी कार्यालयीन अधिकृत नोंदीचाही विचार करण्यात आला.
धर्मादाय आयुक्त कार्यालयातील अधिकृत अभिलेखातील परिशिष्ट-१ नुसार डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे (दीक्षाभूमी) अध्यक्ष म्हणून भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांचे नाव नोंदविण्यात आले आहे. त्यामुळे सध्या उपलब्ध अधिकृत नोंदिनुसार अध्यक्षपद भदंत ससाई यांच्याकडेच कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याच नोंदीनुसार समितीच्या सचिवपदी डॉ. सुधीर फुलझेले यांचे नाव आहे.
बदल अर्ज प्रलंबित, निर्देश देता येत नाही
दरम्यान, संस्थेच्या सदस्यत्वासंदर्भातील बदल अर्ज धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडे प्रलंबित असताना संबंधित विश्वस्तांनाकलम ४१-अ अंतर्गत कोणतेही निर्देश देता येत नसल्याचेही ससाई यांनी स्पष्ट केले. त्यामुळे सदस्यत्वातधील बदलाबाबतचा अर्ज प्रलंबित असताना विद्यमान अधिकृत नोंदिनुसारच समितीची पदाधिकारी रचना ग्राह्य धरली जात असल्याचे त्यांनी सांगितले.











