नागपूर : कुठल्याही समाजाची प्रगती शिक्षणावर अवलंबून असते. उत्तम शिक्षण घेतले तर रोजगाराचे प्रश्न सुटू शकतात. सामाजिक प्रगती होत असते. विविध क्षेत्रांमध्ये प्रतिष्ठेचे स्थान मिळते आणि समाज मुख्य प्रवाहात येतो. त्यामुळे काळाची गरज ओळखून चर्मकार समाजाने देखील शिक्षण आणि कौशल्यावर भर देऊन आपला विकास साधायला हवा. जेवढ्या लोकांना आम्ही उमेदवारी दिली, त्यांनी आपल्या जातीचे कल्याण केल्याचे उदाहरण दिसत नाही, अशी खंत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे बोलताना व्यक्त केली.
स्व. भानूताई गडकरी यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ चर्मकार सेवा संघातर्फे आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून ते उपस्थित होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच भाजपचे शहराध्यक्ष दयाशंकर तिवारी, आमदार कृष्णा खोपडे, चर्मकार सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष भय्यासाहेब बिशाणे यांचीही व्यासपीठावर उपस्थिती होती. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, यासाठी मी मदत करत असतो. हे माझे कर्तव्य आहे. त्यामुळे या आयोजनाचे श्रेय मला देऊ नका, असे आवाहनही गडकरी यांनी आयोजकांना केले.
गडकरी म्हणाले, आपल्या समाजाची प्रगती व्हावी, अशी प्रत्येकाची भावना असते. पण प्रत्यक्ष कृतीतून समाजाची सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिकदृष्ट्या प्रगती साधण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असते. तसा संकल्प आपण करायला हवा. भाषणांनी समाजाची प्रगती होत नाही. त्यासाठी समाजाला विकासाची चळवळ राबवावी लागते. सर्वांत आधी शिक्षणाकडे लक्ष द्यावे लागेल.
ते म्हणाले, अनेकांनी माझ्याकडे उमेदवारी मागितली. अनेकांनी आमच्या समाजातील लोकांना उमेदवारी द्या, नगरसेवक बनवा, असे सांगितले. परंतु जेवढ्या लोकांना आम्ही उमेदवारी दिली, त्यांनी आपल्या जातीचे कल्याण केल्याचे उदाहरण दिसत नाही. एकदा उमेदवारी मिळाली की पुढे ते बायको, मुलगा, मुलीला उमेदवारी द्या, असे सांगतात. काहीतर स्वकीय सहाय्यकालाही उमेदवारीसाठी हट्ट धरतात. उमेदवारी दिली तर समाजाचे भले होईल, असा समज होता, त्याला गेल्या ४०-४५ वर्षांत तडा गेला, असे गडकरी म्हणाले. समाजाबद्दल तळमळ असलेला नेता मिळणे, हीच समाजाची ताकद आहे. जमिनीवर राहून काम केले पाहिजे. मला काय देता, असे म्हणणारे नको. निवडणुकीत आमच्या मागे चर्मकार समाज होता. या समाजासोबत आमचे एक नाते आहे. त्यामुळे समाजासाठी उत्तम काम करण्याची आमची जबाबदारी आहे. समाजाला प्रगतीच्या दिशेने जेवढ्या गतीने नेता येईल, तेवढे आम्ही करणार, असे त्यांनी सांगितले. समाजात शिक्षणकाम, नक्षी काम करणारे असेल, त्यांनी उत्तम काम केले पाहिजे. भविष्यात कला आत्मसात करा, असे आवाहन त्यांनी केले. नोकरी मागणारा नाही तर नोकरी देणारा बनले पाहिजे, असा सल्ला त्यांनी दिला.
स्वयंरोजगाराचा संदेश देताना गडकरी यांनी नागपुरात तयार होत असलेल्या साड्यांचा उल्लेख केला. नागपूरपासून जवळच साड्यांची ही निर्मिती होत आहे. यासंदर्भात लवकरच एका कार्यक्रमाचे आयोजन होणार आहे. त्यासाठी अभिनेत्री हेमा मालिनी नागपुरात येणार आहेत. नागपुरात आल्यानंतर कार्यक्रमाच्या व्यासपीठावर नागपुरात तयार झालेली साडी परिधान करावी, अशी सूचना आपण हेमा मालिनी यांना केल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.
शिक्षण रोजगाराभिमुख हवे
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ‘शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे’, असे म्हटले आहे. परिस्थितीमुळे बरेचदा मुलांना चांगले शिक्षण देणे पालकांना शक्य होत नाही. पण जिद्द ठेवली तर मार्ग निघू शकतो. कुणाला नर्सिंगचे, कुणाला ड्रायव्हिंग, हातमागाचे कौशल्य आत्मसात करायचे असेल तर त्यासाठी त्यांना प्रशिक्षण देणे गरजेचे आहे. शिक्षण हे रोजगाराभिमुख असायला हवे, जेणेकरून प्रशिक्षण घेतल्यानंतर मुले कुटुंबाचा आर्थिक आधार होऊ शकतील, असे गडकरी म्हणाले.














