एक कोटी रुपयांची रक्कम आणि ती मिळवण्यासाठी तीन भावांची सुरू असलेली धडपड, याभोवती फिरणाऱ्या ‘अफरातफरी’ या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला. ट्रेलरमध्ये पैशांसाठी सुरू असलेली भावांची धावपळ, त्यातून निर्माण होणारे गैरसमज आणि मजेशीर प्रसग पाहायला मिळतात. त्यामुळे चित्रपटाबद्दलची उत्सुकता वाढली आहे.
ट्रेलरमध्ये शशांक शेंडे, संजय नार्वेकर, ओंकार भोजने, मोहन आगाशे, नेहा खान, प्राजक्ता हनमघर, आसावरी जोशी, हेमंत पाटील, किरण माने आणि कुणाल मेश्राम यांच्या भूमिका पाहायला मिळतात. एक कोटी रुपये मिळवण्यासाठी प्रत्येक जण आपआपल्या परीने प्रयत्न करताना दिसतो. परिस्थिती आपल्या बाजूने वळवण्यासाठी पात्रांकडून वेगवेगळ्या युक्त्या केल्या जातात. यातून अनेक विनोदी आणि गोंधळाचे प्रसग निर्माण होतात. तात्यांच्या मृत्यूमागचे नेमके सत्य काय आहे? एक कोटी रुपयांची पॉलिसी खरोखर तीन भावांच्या हातात येणार का? पैशांसाठी सुरू झालेली ही धावपळ कुठे थांबणार? या प्रश्नांची उत्तरं चित्रपटात मिळणार आहेत. ट्रेलरमध्ये कथेचे काही संकेत देण्यात आले असले, तरी अनेक रहस्ये कायम ठेवण्यात आली आहेत. दिग्दर्शक मिलिंद झुंबर कवडे यांनी सांगितले की, ट्रेलरमधून चित्रपटातील गोंधळ आणि पात्रांची धावपळ अधिक स्पष्टपणे दाखवण्यात आली आहे. एक कोटी रुपयांची रक्कम प्रत्येक पात्राच्या निर्णयावर परिणाम करते. या सगळ्या गोंधळातून प्रेक्षकांना मनसोक्त हसवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मिलिंद झुंबर कवडे दिग्दर्शित ‘अफरातफरी’ चित्रपट अ स्कायालाइन सिनेमॅटिक आणि येन मुव्ही स्टुडिओज प्रस्तुत, आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगाने तयार झाला आहे. हा चित्रपट ९ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.












