महापौरांनी केली व्यवस्थेची पाहणी
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : मागील दहा ते बारा दिवसांपासून प्रत्येकाच्या मनात घर करणाऱ्या गणरायाचे अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या…! च्या गजरात निरोप होणार आहेत. महापौर नीता ठाकरे यांच्या मार्गदर्शनात उपमहापौर लीला हाथीबोडे, स्थायी समिती सभापति शिवानी दाणी-वखरे, सत्तापक्ष नेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, विरोधीपक्ष नेते संजय महाकाळकर, मनपा आयुक्त डॉ. विपिन इटणकर, वैद्यकीय आरोग्य विशेष समिती सभापती मनीषा अतकरे यांच्यासह इतर सर्व झोन सभापती, अधिकारी व कर्मचारी यांच्या नेतृत्वात बाप्पांच्या पर्यावरणपूरक निरोपासाठी मनपाने जय्यत तयारी केली आहे.
महानगरपालिकेद्वारे नागरिकांच्या सोयीसाठी सक्करदरा तलाव, गांधीसागर तलाव, पोलिस लाइन टाकाळी, कोराडी तलाव, सरदार वल्लभभाई पटेल मैदान कच्छीविक्सा, नाईक तलाव परिसरात उभारण्यात आलेल्या कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्थेची महापौरांनी बुधवारी (ता. २३) पाहणी केली. यावेळी लीला हाथीबोडे, नरेंद्र (बाल्या) बोरकर, संजय महाकाळकर, मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त अंकित यांच्यासह मनपाचे कार्यकारी अभियंता व इतर अधिकारी उपस्थित होते.
पाहणी दरम्यान महापौरांनी विसर्जनासाठी येणाऱ्या भक्तांना कसलाही त्रास होऊ नये याची दक्षता घेण्याचे निर्देश दिले, तसेच विसर्जन स्थळी बॅरीगेटिंग करण्यात यावी, ठोकठिकाणी सुरक्षा रक्षकांची नेमणूक करावी, विद्युत प्रकाश व्यवस्था उत्तम राखावी, विहिरींच्या पाण्याची व्यवस्था ठेवावी, जलतरणपटू यांची नेमणूक करण्यात यावी आधी निर्देश दिले. तर आयुक्त डॉ. विपिन यांनी विसर्जन स्थळावर उपद्रव शोध पथकाचे जवान व पोलिस अधिकारी यांची नेमणूक करण्याच्या सूचना दिल्या.
नागपूर शहरात यंदाचा गणेशोत्सव अतिशय उत्साहात आणि पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या वतीने व्यापक व सर्वसमावेशक तयारी करण्यात आली आहे. शहराच्या जलस्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनाला हातभार लावण्यासाठी मनपातर्फे शहरात विविध ठिकाणी तब्बल २२५ ठिकाणी एकूण ४४७ कृत्रिम विसर्जन कुंडांची निर्मिती करण्यात आली आहे. यात मोठ्या आकाराच्या गणेशच्या मूर्तींच्या विसर्जनासाठी गोरेवाडा, पोलिस लाईन टाकाळी, कच्छीविक्सा आणि कोराडी येथील विशेष मोठे तलाव सज्ज आहेत. याशिवाय, नागरिकांच्या सोयीसाठी शहरात २२ फिरत्या मोबाईल कुंडांची व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे.
१ हजार कर्मचारी सज्ज
शहरात चोख स्वच्छता राखण्यासाठी दहाही झोनमध्ये एक हजार स्वच्छता कर्मचारी युद्धपातळीवर तैनात करण्यात आले आहेत. नागपूरकरांनी या पर्यावरणपूरक मोहिमीत सक्रिय सहभाग नोंदवून नागपूर शहर स्वच्छ आणि सुंदर ठेवण्यासाठी मनपायला सहकार्य करावे, असे आवाहन मनपाद्वारे करण्यात आले आहे.













