कॉलेजमधील भेदभाव आणि विद्यार्थ्यांच्या संगर्षाची गोष्ट सांगणाऱ्या ‘जयंती २’ या मराठी चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ११ सप्टेंबर रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने दुसऱ्या आठवड्यात २ कोटी रुपयांचा गल्ला जमवला आहे. चित्रपटाला मिळणारा प्रतिसाद पाहता त्याचे थिएटरमधील शोही वाढवण्यात आले आहेत.
‘जयंती २’ची निर्मिती मेलिओरिस्ट फिल्म स्टुडिओने केली आहे. शैलेश बळीराम नरवाडे यांनी चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन केले आहे. अभिनेता ऋतुराज वानखेडे यामध्ये मुख्य भूमिकेत आहे. त्याच्यासोबत पायल जाधव, प्रियदर्शनी इंदलकर, रोहिणी हट्टंगडी, देविका दफ्तरदार, विजय निकम, राजकुमार जरांगे आणि मानसी सुभाषक कलाकारही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. चित्रपटाची कथा चंद्रपूरहून उच्च शिक्षणासाठी शहरात येणाऱ्या पायल या मुलीभोवती फिरते. शिक्षण पूर्ण करून शेती करण्याचे तिचे स्वप्न असते. मात्र, कॉलेजमध्ये आल्यानंतर तिला रॅगिंग आणि भेदभावला सामोरे जावे लागते. या अन्यायाविरोधात आवाज उठवल्यानंतर तिचा संघर्ष सुरू होतो. तिला न्याय मिलतो का, याची कथा चित्रपटात मांडण्यात आली आहे.
यासोबतच कॉलेज प्रशासन, शिक्षक-विद्यार्थ्यांचे वर्तन आणि शिक्षण व्यवस्थेतील राजकारण यावरही चित्रपट भाष्य करतो. आजच्या काळातही शिक्षण क्षेत्रात भेदभाव होत असल्याचा मुद्दा चित्रपटातून मांडण्यात आला आहे. पहिल्या आठवड्यात राज्यातील सुमारे १५० थिएटरमध्ये ‘जयंती २’चे शो सुरू होते. चित्रपटाची चर्चा आणि प्रेक्षकांचा प्रतिसाद वाढल्याने दुसऱ्या आठवड्यात २५०हून अधिक थिएटरमध्ये ५००पेक्षा जास्त शो सुरू झाले आहेत. त्यामुळे ‘जयंती २’ची बॉक्स ऑफिसवरील कमाई आणखी वाढण्याची शक्यता आहे.











