नागपूर : नागपूर महानगरपालिकेच्या वतीने श्रीगणेश मूर्तींच्या पर्यावरणपूरक पद्धतीने विसर्जनासाठी शहरातील विविध ठिकाणी कृत्रिम विसर्जन हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. सातव्या दिवशी नागरिकांनी मनपाद्वारे ४९ ठिकाणी उभारण्यात आलेल्या १३७ कृत्रिम तलावांचा वापर करीत ४ हजार ३०३ मातीच्या आणि २४७ पीओपीच्या, अशा एकूण ४ हजार ५५० श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
नागपूर महानगरपालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी शहरात टप्प्याटप्प्याने ४१९ कृत्रिम विसर्जन कुंडांची व्यवस्था केली जात आहे. याशिवाय मोठ्या आकाराच्या श्रीगणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी गोरेवाडा, पोलिस लाइन टाकळी, लकडगंज येथील कच्चीविसा आणि कोराडी येथे विशेष मोठ्या कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली आहे. विसर्जनासाठी येणाऱ्या नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन व सहकार्य मिळावे यासाठी ग्रीन विजल फाउंडेशन सारख्या स्वयंसेवी संस्था तसेच रामदेवबाबा विद्यापीठ या शैक्षणिक संस्थेतील विद्यार्थीही स्वयंस्फूर्तीने सहभागी होत आहेत.
झोननिहाय विसर्जन
लक्ष्मणगर झोनमध्ये १२ कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून, सातव्या दिवशी १ हजार २२७ मातीच्या आणि ३२ पीओपीच्या अशा एकूण १ हजार २५९ श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. धरमपेठ झोनमध्ये ५९ कृत्रिम तलावांची व्यवस्था करण्यात आली असून, येथे १ हजार ६९८ मातीच्या आणि ११७ पीओपीच्या अशा एकूण १ हजार ८१५ मूर्तींचे विसर्जन झाले. हनुमाननगर झोनमध्ये १७ कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून येथे ५४१ मातीच्या आणि १० पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. धंतोली झोनमध्ये ४ कृत्रिम तलावांमध्ये ३१८ मातीच्या आणि ४९ पीओपीच्या अशा एकूण ३६७ मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नेहरूनगर झोनमध्ये २ कृत्रिम तलावांची व्यवस्था असून येथे ३८६ मातीच्या आणि ३४ पीओपीच्या अशा एकूण ४२० मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
गांधीबाग झोनमध्ये २२ कृत्रिम तलाव उभारण्यात आले असून येथे ५ मातीच्या मूर्तींचे विसर्जन झाले. सतरंजीपुरा झोनमध्ये १ कृत्रिम तलावामध्ये ३६ मातीच्या आणि २ पीओपीच्या मूर्तींचे, आशीनगर झोनमध्ये २ कृत्रिम तलावामध्ये १२ मातीच्या आणि ३ पीओपीच्या अशा एकूण १५ मूर्तींचे, तर मंगळवारी झोनमधील १७ कृत्रिम तलावांमध्ये ७३ मातीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. या सोबत पोलिस लाइन टाकळी येथे महानगरपालिकेने उभारलेल्या कृत्रिम तलावात ७ मातीच्या श्रीगणेश मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
नागरिकांनी पर्यावरणपूरक गणेशोत्सवाला प्राधान्य देत मनपाने उपलब्ध करून दिलेल्या कृत्रिम विसर्जन तलावांचा वापर केला असून, नैसर्गिक जलस्त्रोतांचे प्रदूषण रोखण्यासाठी मनपाच्या या उपक्रमाला नागरिकांचा सहभाग मिळत आहे.













