अभंग, विठ्ठल-रुक्मिणी तुकोबांच्या हस्तलिखितांनी महालक्ष्मी उत्सव
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : गौरी-गणपती उत्सवाच्या काळात घरोघर्री महालक्ष्मीचे आगमन होत असताना आकर्षक सजावट आणि विविध देखाव्यांमधून भक्तीचा जागर केला जातो. एस. ई. रेल्वे कॉलनी, प्रतापनगर येथील मीनल मिलिंद माळके यांच्या घरी यंदाच्या महालक्ष्मी उत्सवात मात्र संत तुकाराम महाराजांच्या अभंगांची गाथाच सजावटीचा केंद्रबिंदू ठरली. तब्बल १५० वर्षांची परंपरा असलेल्या माळके परिवाराच्या महालक्ष्मी उत्सवात यंदा साकारलेला हा भक्तिमय देखावा भाविकांचे लक्ष वेधून घेत आहे.
‘श्री तुकारामांची गाथा’ या संकल्पनेवर आधारित या सजावटीत संत तुकाराम महाराजांचे जीवन आणि त्यांची अभंगवाणी साकारण्याचा प्रयत्न करण्यात आला. सजावटीमध्ये विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती, তবला, तुकाराम महाराजांची प्रतिमा तसेच त्यांच्या काही हस्तिखित अभंगांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण देखाव्याला भक्ती, वारकरी परंपरा आणि संत साहित्याचा सुंदर संगम लाभला आहे.
संत तुकारामांच्या अभंगामधून समाजाला मिळालेला संदेश आणि विठ्ठलभक्तीची परंपरा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या सजावटीतून करण्यात आला आहे. केवळ आकर्षक सजावट करण्याऐवजी त्यामागे एक विचार आणि सांस्कृतिक वारसा जपण्याचा संदेश देण्यात आला आहे.
माळके परिवाराच्या महालक्ष्मी उत्सवाला दीडशे वर्षांची समृद्ध परंपरा आहे. अनेक पिढ्यांपासून जपल्या जाणाऱ्या या परंपरेत दरवर्षी भक्तिभावाने महालक्ष्मीची स्थापना केली जाते. यंदा मात्र अभंगांच्या माध्यमातून काहीतरी वेगळे आणि समाजाला प्रेरणा देणारे सादर करण्याचा प्रयत्न केल्याचे मीनल माळके यांनी सांगितले. असे देखावे माळके परिवार गेल्या ३५ वर्षांपासून करीत असून, ते बघण्यासाठी मित्रमंडळी आणि वस्तीतील भक्त आवर्जून महालक्ष्मीच्या दर्शनाला येतात.












