जुन्या वादातून हाणामारी; १० जणांना अटक
लोकवाहिनी न्यूज कन्हान : कायद्याचे रक्षण करणाऱ्या पोलिस ठाण्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच दोन गटांनी एकमेकांवर धावून जात हाणामारी केल्याची धक्कादायक घटना सोमवारी मध्य रात्रीच्या सुमारास कन्हान येथे घडली. जुन्या वादातून निर्माण झालेल्या तणावाचे पर्यवसान सार्वजनिक ठिकाणी मारहाण, शिवीगाळ आणि दगड हातात घेऊन झालेल्या राड्यात झाले. पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून दोन्ही गटांना वेगळे केले. याप्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांसह महाराष्ट्र पोलिस अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोन्ही गटांतील एकूण दहा जणांना अटक करण्यात आल्याची नोंद पोलिस दैनंदिनीत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मोहन भगवानसिंग चौहान आणि करणसिंग परमार यांच्याशी संबंधित दोन्ही गटांमध्ये यापूर्वीपासून वाद सुरू होता. या प्रकरणातून कन्हान पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल होता. दोन्ही पक्षांकडून पुन्हा वाद होऊ नये, यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली होती. संबंधितोंना पोलिस ठाण्यात बोलावून भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६८ अन्वये नोटीस देत शांतता राखण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या.
मात्र, १२ ऑक्टोबरच्या रात्री पोलिस ठाण्याबाहेर आरडाओरड सुरू झाली. आवाज ऐकून पोलिस उपनिरीक्षक पंकज गुप्ता आणि अन्य पोलिस कर्मचारी बाहेर आले असता, मुख्य प्रवेशद्वाराजवळील रस्त्यावर दोन्ही गटाचे सदस्य एकमेकांना मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याचे दिसून आले. काहींच्या हातात दगडही असल्याचे तक्रारीत नमूद आहे.
पोलिस निरीक्षक वैयंन्ती मंडवधरे, पोलिस उपनिरीक्षक कृष्णा गोंगले आणि अन्य कर्मचाऱ्यांनी हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी दोन्ही गटांना वेगळे केले. या झटापटीत दोन्ही बाजूंचे काही जण जखमी झाल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
घटनास्थळावरून काही संशयितांना ताब्यात घेण्यात आले, तर काही जण पोलिसांना पाहून पळून गेल्याची माहिती आहे. या प्रकरणात मोहन भगवानसिंग चौहान, सौरभ उर्फ सोनू ठाकूर, गौरव उर्फ मोन्यू ठाकूर, सचिन तोमर, राहुल जैन, इम्रान उर्फ इम्मू खान, बब्लू उर्फ लोकनाथ पिल्ले, करणसिंग परमार, विक्रमसिंग परमार आणि तालिब हुसेन मिर बक्ष या दहा जणांना अटक करण्यात आल्याची नोंद आहे. याप्रकरणी बेकायदेशीर जमाव जमविणे, मारहाण, दंगल आणि सार्वजनिक शांततेचा भंग केल्याच्या आरोपांवरून पुढील तपास सुरू आहे.
पोलिस ठाण्याच्या प्रवेशद्वाराजवळच असा प्रकार घडल्याने परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. जुन्या वादातून निर्माण झालेल्या संघर्षाला वेळीच आळा घालण्यासाठी पोलिसांनी केलेल्या प्रतिबंधात्मक कारवाईनंतरही हा राडा झाल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे. फरार संशयितांचा शोध आणि घटनेमागील नेमकी पार्श्वभूमी याबाबत पोलिसांचा पुढील तपास महत्वाचा ठरणार आहे.













