नाराज पदाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
प्रसन्न जकाते
नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपचे माजी आमदार सुधाकर कोहळे यांना महायुतीने उमेदवारी दिल्यानंतर निर्माण झालेली राजकीय समीकरणे आता वेगळे वळण घेत आहेत. भाजपचे बंडखोर माजी आमदार प्रा. अनिल सोले यांची नाराजी दूर करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना यश आले आहे. तरी कोहळे यांच्यावर नाराज असलेल्या महायुतीतील शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे काय, हा प्रश्न कायम आहे.
प्रा. सोले यांची नाराजी दूर झाली; पण कोहळेंबद्दलची नाराजी दूर होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सुधाकर कोहळे नागपूर सुधार प्रन्यासमध्ये विश्वस्त असताना त्यांनी शिवसेनेच्या एकाही पदाधिकाऱ्याचे काम केले नाही, असा आरोप आहे. त्यामुळे शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांमध्ये त्यांच्याविषयी प्रचंड नाराजी आहे.
नासुप्रचे विश्वस्त असताना देवनगर गृहनिर्माण सहकारी संस्थेच्या प्रकरणावरूनही कोहळे यांच्यावर भूखंडावरून आरोप झाले. त्यावेळी ते नागपूर शहर भाजपचे अध्यक्ष आणि दक्षिण नागपूरचे आमदार होते. बनावट कागदपत्रे तयार करून भूखंड लाटल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला होता. याच विश्वस्त काळात शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी विविध कामांसाठी त्यांच्याकडे पाठपुरावा केला; मात्र प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यामुळे आम्ही यंदा लोकवाहिनीशी बोलताना व्यक्त दाखवून देऊ अशी नाराजी केली.
निवडणुकीत वचपा काढणार?
नासुप्रमधील या जुन्या नाराजीचा हिशेब पदवीधर निवडणुकीत चुकता करण्याची तयारी शिवसेनेतील काही पदाधिकाऱ्यांनी केली आहे. सुरुवातीला हा नाराज गट प्रा. अनिल सोले यांना साथ देण्याच्या तयारीत होता. मात्र, सोले यांची नाराजी दूर झाल्याने त्यांच्या भूमिकेचा पर्यायही आता बदलला आहे. त्यामुळे कोहळे यांना विरोध करणाऱ्या या पदाधिकाऱ्यांसमोर कोणाला साथ द्यायची, असा प्रश्न निर्माण झाला आहे. पक्षश्रेष्ठींचा आदेश काहीही असला, तरी स्थानिक पातळीवर कोणाला साथ द्यायची आणि कोणाला विरोध करायचा, याचा निर्णय एकत्रितपणे घेण्याची भूमिका या नाराज गटाकडून घेतली जाणार आहे. त्यामुळे महायुतीचा उमेदवार म्हणून कोहळे यांच्यापुढे केवळ निवडणुकीचेच नव्हे, तर मित्रपक्षातील नाराजी दूर करण्याचेही आव्हान आहे. प्रा. सोले यांची समजूत काढण्यात भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना यश आले असले, तरी शिवसेनेतील नाराजीचा तिढा सुटणार का, यावर पदवीधर निवडणुकीतील महायुतीची पुढील रणनीती अवलंबून राहणार आहे.












