दीक्षाभूमीतील नागरी सुविधांची आयुक्तांकडून पाहणी
लोकवाहिनी न्यूज, नागपूर : येत्या २० ऑक्टोबरला होणाऱ्या धम्मचक्र प्रवर्तन दिन मुख्य समारोह आणि इतर दिवशी देखील दीक्षाभूमीवर दाखल होणाऱ्या बौद्ध अनुयायांसाठी नागरी सुविधा आणि आरोग्याच्या दृष्टीने संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छतेसह नागरी सुविधा पुरविण्याला प्राधान्य द्या, असे निर्देश मनपा आयुक्त डॉ. विपिन इटनकर यांनी दिले.
धम्मचक्रप्रवर्तन दिनानिमित्त मनपाच्या वतीने करण्यात येत असलेल्या व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी महानगरपालिका आयुक्त डॉ. इटनकर यांनी मंगळवार (ता. १३) रोजी दीक्षाभूमी परिसराला भेट दिली. यावेळी नागपूर महानगरपालिका तसेच जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, समाज कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
येत्या २० ऑक्टोबरला धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा होणार आहे. यासाठी विविध राज्यांतून येणाऱ्या अनुयायांसाठी दीक्षाभूमी परिसर, पीकेव्ही, आयटीआय व कुर्वेज हायस्कूलमध्ये केलेल्या नागरी सुविधांच्या व्यवस्थेची पाहणी करण्यात आली. याशिवाय वैद्यकीय व्यवस्था व परिवहन व्यवस्था सुद्धा मनपातर्फे उपलब्ध केली जाणार आहे. यावेळी अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त मिलिंद मेश्राम, पोलीस उपायुक्त ऋषिकेश रेड्डी, अतिरिक्त जिल्हाधिकारी प्रवीण महिरे तसेच झोनल स्वच्छता अधिकारी ऋषिकेश इंगळे उपस्थित होते.
येत्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लाखो बौद्ध अनुयायी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी दीक्षाभूमीवर येणार आहेत. त्यानुसार १८ ऑक्टोबर ते २१ ऑक्टोबर या कालावधीमध्ये नागपूर महानगरपालिकेच्या वतीने दीक्षाभूमीवर अनुयायांसाठी आवश्यक त्या सर्व नागरी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत आहे. संपूर्ण दीक्षाभूमी परिसरामध्ये स्वच्छतेला विशेष प्राधान्य देण्याबाबत मनपा आयुक्त डॉ. इटनकर यांनी प्रशासनाला निर्देश दिले.
यावेळी आयुक्त यांनी इतर अधिकाऱ्यांसोबत दीक्षाभूमीचा संपूर्ण परिसर, मुख्य समारंभाचे ठिकाण, डॉ. आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडिज अँड रिसर्च येथील इमारतीच्या मागील बाजूस असलेल्या जागेत तात्पुरत्या शौचालयांची व्यवस्था, माता कचेरी सार्वजनिक आरोग्य विभाग परिसर आणि शासकीय औद्योगिक प्रशिक्षण केंद्र (आयटीआय), मध्यवर्ती कारागृह व अन्य नागरी सुविधा या सर्व व्यवस्थेची पाहणी केली. दीक्षाभूमी स्तूप, तसेच सर्व मार्ग आणि शौचालयांच्या ठिकाणी वीज पुरवठा निरंतर सुरू राहील याकडे कटाक्षाने लक्ष देणे तसेच प्रसाधनगृहांमध्ये वीज पुरवठ्यासोबतच निरंतर पाणी पुरवठा देखील ठेवणे आणि सर्व शौचालयांच्या ठिकाणी स्वच्छतेसाठी हँडवॉशची व्यवस्था करण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिले. अनुयायांना राहण्यासाठी यावर्षी शहरातील विविध भागांमध्ये नागरी सुविधांसह २१ डोम उभारण्यात आले आहेत. हे सर्व डोम वॉटर प्रूफ राहणार आहेत. जिल्हा प्रशासन व सामाजिक न्याय व सहाय्य विभागाच्या मदतीने हे डोम उभारण्यात आले आहेत. यात दीक्षाभूमी परिसरात ५ डोम राहणार आहेत. याशिवाय या परिसरातील पीकेव्हीच्या पदव्युत्तर वसतिगृह येथे ६ डोमची व्यवस्था राहणार आहे, तसेच कुर्वेज हायस्कूलमध्ये ४ डोममध्ये अनुयायांना मुक्काम करता येणार आहे.
अनुयायांसाठी वैद्यकीय पथक
काछीपुरा पोलीस चौकीसह इतर ठिकाणी मनपाचे आरोग्य सेवा पथक उपलब्ध राहणार आहे. त्याचप्रमाणे मनपातर्फे संचलित आपली बसच्या व्यवस्थेबद्दलची माहिती अनुयायांना काछीपुरा पोलीस चौकीजवळ उपलब्ध होणार आहे. दीक्षाभूमी ते ड्रॅगन पॅलेस पर्यंत मनपातर्फे बस सेवा उपलब्ध राहणार आहे.













