ऑगस्टपासून हवामान बदलाचा आरोग्यावर परिणाम कायम
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : ऑगस्ट महिन्यापासून नागपूरकरांच्या आरोग्यावर विविध आजारांचे सावट कायम आहे. जुलैपासून सुरू झालेली व्हायरल तापाची साथी सप्टेंबरपर्यंत लांबल्यानंतर सप्टेंबर आणि ऑक्टोबरमध्ये डेंग्यूने शहरात थैमान घातले. डेंग्यूच्या रुग्णांमुळे सरकारी आणि खासगी रुग्णालयांवरील ताण वाढला होता. आता डेंग्यूचा प्रादुर्भाव काहीसा कमी होत असतानाच शहरात पुन्हा एकदा सिझनल व्हायरलच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. बदलते हवामान आणि तापमानातील चढ-उतार यामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या वाढल्या आहेत।
गेल्या चार दिवसांपासून नागपूरच्या वातावरणात बदल जाणवत आहे. ऑक्टोबर हिटचा जोर कमी झाला असून पहाटे आणि रात्रीच्या वेळी गारवा जाणवू लागला आहे. दिवसा उष्णता आणि रात्री थंडावा अशा बदलत्या वातावरणामुळे ताप, सर्दी, खोकला यांसारख्या तक्रारींमध्ये वाढ होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी वातावरण तयार झाले असून हवामान विभागानेही अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. त्यामुळे तापमानातील चढ-उतार आणखी वाढण्याची शक्यता आहे।
ॲलर्जी, सायनस, अस्थमाच्या रुग्णांना चिंता
ऑगस्टपासून सातत्याने बदलणाऱ्या हवामानाचा परिणाम ॲलर्जी, सायनस आणि अस्थमाच्या रुग्णांवरही होत आहे. वातावरणातील बदलांमुळे या रुग्णांना वारंवार त्रासाला सामोरे जावे लागत आहे. पावसाचा अनियमितपणा, तापमानातील चढ-उतार आणि ऋतुबदल यामुळे श्वसनाशी संबंधित तक्रारी वाढण्याची चिंता व्यक्त केली जात आहे. डॉ. सोनाली मानकर यांनी ‘लोकवाहिनी’शी बोलताना सांगितले की, पूर्वी तापाच्या काही रुग्णांमध्ये तीन दिवसांत आराम मिळत असल्याचे दिसत होते।
सध्या व्हायरल संसर्गानंतर ताप आणि त्यानंतरचे त्रास पाच ते सात दिवस किंवा त्यापेक्षा अधिक काळ जाणवत असल्याच्या तक्रारी आहेत. काही रुग्णांमध्ये ताप कमी झाल्यानंतरही अशक्तपणा आणि इतर लक्षणे कायम राहतात. ताप आल्यास स्वतःहून अँटिबायोटिक्स घेणे टाळावे. व्हायरल संसर्गावर अँटिबायोटिक्सचा थेट परिणाम होत नाही. डॉक्टरांच्या सल्ल्यानेच औषधे घ्यावीत, तसेच ताप दीर्घकाळ टिकल्यास किंवा प्रकृती खालावल्यास वैद्यकीय तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्यतज्ज्ञांकडून केले जाते।












