वंजारी पडले कोहळेंवर भारी ; कराळे मास्तरांनी गणित बिघडवले
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूरमध्ये मंगळवारी सकाळी मतमोजणी सुरू झाली आणि २८ ऑक्टोबरच्या रात्री उशिरापर्यंत सुरू होती. काही वेळा भाजप आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांच्या उमेदवारांनी आघाडी घेतली. परंतु दोन्हीपैकी कोणताही उमेदवार बहुमताच्या आकड्यापर्यंत पोहोचला नव्हता. या चढ-उतारामुळे केवळ नागपूरमध्येच नव्हे, तर संपूर्ण राज्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते. परंतु अटीतटीच्या अशा निवडणुकीत मोठा उलटफेर होत काँग्रेसचे अभिजित वंजारी विजयी झाले. त्यामुळे काँग्रेसचे कार्यकर्त्यांनी भाजपच्या विरोधात घोषणाबाजी करून वातावरण दणाणून सोडले.
या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या नितेश कराळे यांना मिळालेल्या दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे सुधाकर कोहळेंचे मतांचे गणित बिघडले आणि वंजारी विजयी झाले. कराळे मास्तरांच्या मतांची मोजणी सुरू झाल्यानंतर, यापैकी सुमारे ७० टक्के मते काँग्रेसचे अभिजित वंजारी यांना, तर ३० टक्के मते सुधाकर कोहळे यांना मिळाली. यामुळे दोन्ही उमेदवारांमधील मतांचे अंतर कमी झाले, आणि या निवडणुकीत कराळे मास्तर गेमचेंजर ठरले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा बालेकिल्ला असलेल्या नागपूरमधील विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची असल्याने या निवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागलेले होते. यादरम्यान, मंगळवारी सकाळपासून सुरू असलेल्या मतमोजणीत भाजपचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात अटीतटीची लढत दिसून येत आहे, त्यातच अपक्ष नितेश कराळे यांनी सुमारे २५ हजारच्या आसपास मते घेतल्याने लढतीत रंगत आली.
दरम्यान, नागपूर पदवीधर मतदार संघात एकूण ३८ उमेदवार रिंगणात उभे होते. मुख्य लढत भाजपच्या सुधाकर कोहळे आणि काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांच्यात होती. सुमारे सहा दशकांच्या वर्चस्वानंतर २०२० मध्ये काँग्रेसने हिसकावलेली जागा पुन्हा मिळवण्याचा प्रयत्न भाजप करीत होता. या निवडणुकीत गेल्या निवडणुकीचे विजेते काँग्रेसचे अभिजित वंजारी यांनी मतात पुन्हा आघाडी घेतली आणि त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी विजयाचा जल्लोष सुरू केला. भाजपच्या सुधाकर कोहळे यांनी आपला पराभव मान्य केला आहे.












