नागपुरात भाजपची ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ महारॅली
कॉंग्रेसवर संविधान आणि लोकशाही संस्थांना बदनाम केल्याचा आरोप
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : राहुल गांधी आणि काँग्रेसला लक्ष्य करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरातून आक्रमक राजकीय इशारा दिला. संविधानाशी खेळ कराल तर तुमचेही हात पोळतील. रस्त्यावरच्या लढाईची भाषा कराल, तर आम्हीही त्यासाठी सज्ज आहोत, अशा शब्दात फडणवीस यांनी राहुल गांधींना आव्हान दिले. भाजप आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या ‘लोकशाही वाचवा, अराजकता हटवा’ अभियानांतर्गत नागपुरात आयोजित महारॅलीपूर्वी यशवंत स्टेडियमवर झालेल्या सभेत ते बोलत होते.
राहुल गांधी यांच्या नेतृत्वखाली देशात लोकशाही व्यवस्था आणि संविधानाला लक्ष्य करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा गंभीर आरोप फडणवीस यांनी केला. केवळ सत्ता-परिवर्तन नव्हे, तर देशाची लोकशाही व्यवस्था आणि संविधान बदलण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा दावा करत त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशात अतिडाव्या विचारसरणीची व्यवस्था निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
मतदार यादीवरून काँग्रेसवर निशाणा
मतदार यादीतील बांग्लादेशी नागरिकांच्या नावांचा मुद्दा उपस्थित करत फडणवीस यांनी काँग्रेसवर निशाणा साधला. चार कोटी बंग्लादेशींची नावे मतदार यादीत होती, ती वगळल्यामुळे काँग्रेस अस्वस्थ झाली आहे, असा दावा त्यांनी केला. जीवंत मतदारांच्या पाठिंब्यावर विश्वास नसल्याने मृत व्यक्तींची नावे पुन्हा मतदार यादीत समाविष्ट करण्याची मागणी केली जात असल्याचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी काँग्रेसवर जनमताच्या चोरीचा आरोप केला.
आणीबाणीचा दाखला देत काँग्रेसवर प्रहार
काँग्रेसच्या संविधानविरोधी भूमिकेचा इतिहास सांगताना फडणवीस यांनी १९५७ मधील आणीबाणीचा संदर्भ दिला. अलाहाबाद उच्च न्यायालयानाने तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची निवडणूक रद्द ठरवल्यानंतर काँग्रेसने बहुमताच्या जोरावर घटनादुरुस्ती करून पंतप्रधानांना न्यायालयीन नियंत्रणापासून संरक्षण देण्याचा प्रयत्न केला, असा आरोप त्यांनी केला. त्यानंतर मोरारजी देसाई यांच्या सरकारने हा बदल दुरुस्त करून पंतप्रधानही न्यायालयीन अधeen राहतील, अशी तरतूद केल्याचे सांगितले.
‘लाल संविधान’च्या मुद्द्यावरून सवाल
राहुल गांधी यांच्या हातातील लाल रंगाच्या संविधानाच्या प्रतीवरूनही फडणवीस यांनी टीका केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान निळ्या रंगाशी जोडलेले असताना राहुल गांधी लाल संविधान कुडून आणतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. संविधानाने निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरील जनतेचा विश्वास कमी करण्याचे काम सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. श्रीलंका, नेपाल, बांग्लादेश आणि पाकिस्तानमधील राजकीय परिस्थितीचा दाखला देत भारतातही तशाच प्रकारची अस्थिरता निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा फडणवीस यांनी केला.















