सोळाव्या शतकातील ३५८ पानांच्या हस्तलिखिताला जागतिक मान्यता
लोकवाहिनी न्यूज
पुणे : पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. संस्थेतील महाभारताच्या दुर्मीळ हस्तलिखिताचा युनेस्कोच्या प्रतिष्ठित ‘मेमरी ऑफ द वर्ल्ड रजिस्टर’ या जागतिक नोंदणीत समावेश करण्यात आला आहे. या जागतिक सूचीमध्ये आत्तापर्यंत समाविष्ट झालेल्या भारतातील १७ ग्रंथांपैकी सहा ग्रंथ भांडारकर संस्थेतील आहेत, अशी माहिती संस्थेचे मानद सचिव प्रा. सुधीर वैशंपायन यांनी दिली.
संस्थेतील ‘१५९/१८७५-७६’ क्रमांकाचे महाभारताचे हस्तलिखित इसवी सनाच्या सोळाव्या शतकातील आहे. भूर्जपत्रांवर शारदा लिपीत लिहिलेल्या या हस्तलिखितात एकूण ३५८ पाने आहेत. प्रख्यात विद्वान जॉर्ज ब्युलर यांनी १८७५ मध्ये काश्मीरमधून हे हस्तलिखित मिळवले होते. भांडारकर संस्थेने प्रकाशित केलेल्या महाभारताच्या संशोधित आवृत्तीचा हा महत्त्वाचा मूलाधार मानला जातो.
या हस्तलिखिताचा युनेस्कोच्या जागतिक नोंदव्हीत समावेश व्हावा, यासाठी नवी दिल्लीतील इंदिरा गांधी राष्ट्रीय कला केंद्राचे संशोधनाधिकारी डॉ. रमेशचंद्र गौर आणि डॉ. मयंक शेखर यांनी गेल्या वर्षी प्रस्ताव सादर केला होता. या प्रक्रियेत भांडारकर संस्थेतील डॉ. श्रीनंद बापट, डॉ. अमृता नातू आणि बाळकृष्ण जोशी यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले.















