महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या भूमिकेवरही शंका : व्यावसायिकांना नोटिसा बजावण्याचे आश्वासन हवेतच
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : दिवाळीच्या सणानिमित्त ग्राहकांना आकर्षित करून लाखोंची उलाढाल करणाऱ्या नागपुरातील प्रतिष्ठित व्यावसायिक प्रतिष्ठांनी तसेच ज्वेलर्सनी त्यांच्या शोरुम्सपुढील वृक्षांवर विद्युत रोषणाई करून पर्यावरणविषयक नियमांचे सर्रासपणे उल्लंघन केल्याचे अद्यापही दिसत आहे। वृक्षांवरील रोषणाईबाबत ‘दैनिक लोकवाहिनी’ने सतत चार दिवस वृत्तमालिका प्रकाशित केल्यानंतर महापालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग येईल आणि संबंधित व्यावसायिकांवर कायद्यानुसार कारवाई होईल, अशी अपेक्षा पर्यावरण प्रेमींकडून व्यक्त केली जात होती। मात्र महापालिका अधिकाऱ्यांच्या अनास्थेपायी या पर्यावरण प्रेमींचा भ्रमनिरास झाला आहे। आज दिवाळी संपून जवळपास दहा दिवसांचा कालावधी लोटला तरी, व्यावसायिक प्रतिष्ठानंसमोरील सार्वजनिक जागेवर असलेल्या झाडांवरील रोषणाई हटविण्यात आलेली नाही। त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, केवळ कारवाईचे आश्वासन द्यायचे आणि स्वतःचे खिसे गरम करायचे, अशी शंका आता व्यक्त केली जात आहे।
दिवाळी सणादरम्यान ‘दैनिक लोकवाहिनी’ने नागपूर नगरीच्या पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये म्हणून मोठ्या शोरुम्स समोरील वृक्षांवरील रोषणाई आणि बुंध्यांना लावलेल्या दिव्यांविषयी मालिका प्रसिद्ध करून, शहरातील प्रतिष्ठित व्यावसायिकांकडून पर्यावरणावर घातलेला घाला उघडकीस आणला होता। वृक्षांवरील रोषणाईबाबत असलेले कायदे आणि निसर्गप्रेमींची मते जाणून घेत वास्तविकता मांडली होती। (पान ६ वर)
कायद्याबाबत अज्ञान
दरम्यान, यासंदर्भात दैनिक लोकवाहिनीच्या प्रतिनिधीने महापालिका उद्यान विभागाचे उपायुक्त गणेश राठोड यांच्याशी संपर्क साधला असतो त्यांनी झाडांवर विद्युत रोषणाई करणाऱ्या व्यावसायिकांवर नोटिसा बजावण्याचे आदेश उद्यान अधीक्षक अमोल चोरपगार आणि झोननिहाय अधिकाऱ्यांना दिल्याचे सांगितले। यावर चोरपगार यांच्याशी संपर्क साधला असतो त्यांनी बोलण्यास टाळाटाळ केल्याचे दिसून आले। असा कुठलाही कायदा मला माहिती नाही, असे चोरपगार यांचे म्हणणे आहे। त्यामुळे जाणीवपूर्वक कायद्याचे अज्ञान सांगून मोठ्या व्यावसायिकांना वाचविण्याची वृत्ती तर चोरपगार जोपासत नाही ना? अशी शंका येत आहे। दिवाळीत लक्ष्मी दर्शनासाठी कारवाईस टाळाटाळ केली गेली का? असा प्रश्नदेखील चोरपगार यांच्या उत्तरातून उपस्थित होऊ लागला आहे।















