गडकरी यांनी सांगितले मका पिकाचे फायदे
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : देशात धान्याच्या अतिरिक्त साठ्याची मोठी समस्या आहे. खतांचे दर वाढत आहे, त्या तुलनेत गहू, तांदूळ, मक्याचे दर वाढत नाही. मक्यापासून इथेनॉल तयार करण्याचा विचार सुरू झाला. त्यावेळी बाजारात मक्याचे दर १२०० रुपये क्विंटल होते तर किमान आधारभूत किंमत १८०० रुपये होती. मक्यापासून इथेनॉल तयार करण्यास सुरुवात झाली, त्यानंतर दर २६०० रुपये क्विंटल झाले. यातून बिहार व उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांच्या खिशात ४५ हजार कोटी रुपये गेले, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे बोलताना नमूद केले.
शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे असेल, तर पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड द्यावी लागेल, हा केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांचा सातत्याने आग्रह राहिला आहे. इथेनॉलसारख्या पर्यायी इंधनाच्या माध्यमातून शेतीमालाला नवी बाजारपेठ, ऊस आणि मका उत्पादकांना अतिरिक्त उत्पन्नाचे साधन मिळू शकते. शेती केवळ उदरनिर्वाहाचे साधन न राहता ती आर्थिक समृद्धीचा मार्ग बनावी आणि शेतकरी केवळ अन्नदाता न राहता ऊर्जादाता व्हावा, ही भूमिका त्यांनी नेहमीच आपल्या भाषणातून मांडली. रविवारीही एका कार्यक्रमातून त्यांनी इथेनॉलमुळे शेतकऱ्यांचे अर्थकारण बदलल्याचे सांगितले.
इंडियन फेडरेशन ऑफ ग्रीन एनर्जीच्या वतीने रविवारी हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये ‘अन्नदाता ते ऊर्जादाताः विकसित भारतासाठी बायोगॅस आणि सीबीजी (कॉम्प्रेस्ड बायोगॅस) विस्तारीकरण’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी बोलत होते. यावेळी राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, राज्याचे साखर आयुक्त डॉ. संजय कोलते, महाजनको, महावितरणचे संचालक विश्वास पाठक आदी उपस्थित होते.
यावेळी गडकरी म्हणाले, नागपूर महापालिकेने तीन वर्षांपूर्वी जैविक कचऱ्यापासून सीबीजी तयार करण्याचा प्रकल्प सुरू केला. आज प्रतिदिन १६ टन सीबीजी तयार करण्यात येत आहे. भविष्यात दररोज ३६ टन तयार होईल. बायोमास, राईस स्ट्रॉ, बगास यांवर प्रक्रियेचे तंत्रज्ञान आले आहे. सरकारची योजना व नव्या तंत्रज्ञानामुळे आता बाजार उपलब्ध झाला आहे. सिद्ध तंत्रज्ञान, आर्थिक व्यवहार्यता, कच्च्या मालाची उपलब्धता, अनुकूल बाजार या चारही गोष्टी अनुकूल आहे. यासोबतच त्यांनी विदर्भात जास्तीत जास्त सीबीजी व इतर इंधनाच्या प्रकल्पासाठी शेतकरी, उद्योजकांनी पुढे यावे, असे आवाहनही केले.















