सिंधी समाजाला जमिनींचे मालकी हक्क देणार
लोकवाहिनी न्यूज
उल्हासनगर : शहरातील अनधिकृत घरे अधिकृत करण्यासह समूह विकास योजनेच्या माध्यमातून उल्हासनगरचा सुनियोजित विकास केला जाईल, तसेच सिंधी समाजाला जमिनींचे मालकी हक्काचे पट्टे देऊन त्या फ्री होल्ड करण्याचा निर्णयही लवकरच अमलात आणला जाईल, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. उल्हासनगरला पुन्हा नियोजित शहराचे स्वरूप प्राप्त करून देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चांदीबाई हिम्मतमल मनसुखानी महाविद्यालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
उल्हासनगर हे एकेकाळी देशातील पहिले नियोजित शहर म्हणून ओळखले जात होते. मात्र, कालांतराने शहराचे स्वरूप बदलले. आता पुन्हा शहराचा नियोजनबद्ध विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. हैदराबाद सिंध नॅशनल कॉलेजिएट (एचएसएनसी) संस्थेच्या चांदीबाई हिम्मतमल मनसुखानी (सीएचएम) महाविद्यालयाच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी सिंधी समाजाच्या जमिनींच्या मालकी हक्काचा प्रश्न सोडवण्याबाबतही महत्त्वाची घोषणा केली. सिंधी समाजाला त्यांच्या जमिनीचे मालकी हक्काचे पट्टे देऊन त्या फ्री होल्ड करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयाची सुरुवात नागपूरमधून झाली असून, लवकरच उल्हासनगरमध्येही त्याची अंमलबजावणी केली जाईल. हा निर्णय प्रत्यक्षात आणण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
उल्हासनगरचा तिसऱ्या मुंबईच्या संकल्पनेत समावेश करण्याची मागणी यावेळी करण्यात आली होती. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, उल्हासनगरचा या संकल्पनेत आधीच समावेश करण्यात आला आहे. शहराला मेट्रोची सुविधा मिळावी, यासाठी २०१८ मध्ये घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार मेट्रोचे काम पुढे जात असून, लवकरच शहराला मेट्रोची जोडणी मिळेल. याशिवाय सिमेंट काँक्रीटचे रस्ते, उड्डाणपूल आणि स्वतंत्र पिण्याच्या पाण्याची योजना यांसारख्या कामांना सरकारने मंजुरी दिली आहे. ही कामे सुरू झाली असून, शहराचा चेहरामोहरा बदलण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले. सीएचएम महाविद्यालयाच्या नव्या इमारतीसह स्मार्ट वर्गखोल्यांचेही मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले. आजच्या काळात केवळ पदवी मिळवणे पुरेसे नाही. विद्यार्थ्यांकडे पदवीसोबत प्रत्यक्ष कामात उपयोगी पडणारे ज्ञान आणि कौशल्य असणे आवश्यक आहे. अन्यथा पदवीला फारसा अर्थ उरत नाही, असे ते म्हणाले.
भारत हा तरुणांचा देश असून, येथील नागरिकांचे सरासरी वय २७ वर्षे आहे. चीनमध्ये हे वय ३९, अमेरिकेत ४०, युरोपमध्ये ४१ ते ४५, तर जपानमध्ये ४६ वर्षे आहे. भारतातील तरुणांना योग्य कौशल्य प्रशिक्षण दिल्यास देश जगाला कुशल मनुष्यबळ पुरवू शकेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. १९४९ मध्ये वांद्रे येथे नॅशनल कॉलेजची स्थापना झाली.













