लोकवाहिनी न्यूज नागपूर : शहरातील अनधिकृत होर्डिंग्ज आणि बॅनर्सच्या सुळसुळाटावर नियंत्रण मिळवण्यात अपयशी ठरलेल्या नागपूर महानगरपालिकेवर मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. जानेवारी ते नोव्हेंबर २०२६ या कालावधीत शहरात तब्बल १० हजार २३ अवैध होर्डिंग्ज आढळून आले असताना महापालिकेने संबंधित शुभेच्छुकांकडून केवळ २७ हजार रुपयांचा दंड वसूल केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे.
सामाजिक कार्यकर्ते दिनेश नायडू यांनी याप्रकरणी उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली आहे. सुनावणीदरम्यान मनपा आयुक्तांच्या वतीने वर्षभरात करण्यात आलेल्या कारवाईचा झोननिहाय सविस्तर अहवाल न्यायालयात सादर करण्यात आला. या अहवालानुसार, लक्ष्मीनगर झोनमध्ये सर्वाधिक अवैध होर्डिंग्ज आढळून आले आहेत. शहरातून १० हजार २३ अवैध बॅनर्स व होर्डिंग्ज हटवण्यात आले असले, तरी शुभेच्छुकांकडून झालेली दंडवसुली केवळ तीन झोनपुरतीच मर्यादित राहिली आहे.
यामध्ये सतरंजीपुरा झोनमधून १२ हजार रुपये, नेहरूनगर झोनमधून १० हजार रुपये आणि धंतोली झोनमधून ५ हजार रुपये असा एकूण केवळ २७ हजार रुपये दंड वसूल झाला असून, उर्वरित सात झोनमध्ये दंडवसुली पूर्णपणे शून्य आहे. तसेच, १० हजार २३ प्रकरणांमध्ये महापालिकेने शुभेच्छुकांविरोधात पोलीस ठाण्यांत केवळ २२१ तक्रारी दिल्या असून, त्यातून फक्त धरमपेठ झोनमध्ये एकच गुन्हा नोंदवण्यात आल्याचे या माहितीमधून उघड झाले आहे.
दरम्यान, उच्च न्यायालयाने १० डिसेंबर २०२५ रोजी प्रति होर्डिंग पाच लाख रुपये दंड वसूल करण्यासाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार महापालिकेने आतापर्यंत १ हजार ९५८ शुभेच्छुकांना नोटिसा बजावल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी ३० नोव्हेंबर रोजी निश्चित करण्यात आली आहे.
नेत्यांवर गुन्हे दाखल होत नाही सुनावणीदरम्यान याचिकाकर्त्याच्या वतीने प्रशासनाच्या दुटप्पी कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. गेल्या वर्षीही महापालिकेने शहरातील २० हजार अवैध होर्डिंग्ज शोधून काढले होते; परंतु अवैध होर्डिंग्ज व बॅनर्स लावण्यात सहभागी असलेल्या राजकीय व्यक्तींविरुद्ध पोलीस ठाण्यांत गुन्हे नोंदवले जात नाहीत, ही गंभीर बाब त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली.















