नव्या पिढीसमोर करिअरचे वेगळे पर्याय उपलब्ध : वैमानिक प्रशिक्षणापासून ड्रोन पायलटपर्यंत
लोकवाहिनी न्यूज गडचिरोली : दुर्गम आणि आदिवासीबहुल गडचिरोली जिल्ह्यातील युवक-युवतींसाठी आता विमान वाहतूक आणि ड्रोन तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात करिअरची दारे खुली होणार आहेत. जिल्हा परिषदेच्या पुढाकारातून मुलींना इंडिगोच्या माध्यमातून १०० टक्के मोफत निवासी वैमानिक प्रशिक्षणाची संधी उपलब्ध होणार असून, दुसरीकडे अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींना ‘अमृत ड्रोन मिशन’ अंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षण घेता येणार आहे. पारंपरिक रोजगाराच्या पर्यायांपलीकडे जाऊन आधुनिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कौशल्य आणि रोजगार मिळविण्याची संधी या दोन उपक्रमांतून उपलब्ध झाली आहे.
जिल्हा परिषद, गडचिरोलीच्या पुढाकाराने इंडिगो आणि इंडिगोरीच यांच्या सामाजिक उत्तरदायित्व उपक्रमांतर्गत मुलींसाठी मोफत निवासी वैमानिक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण आणि दुर्गम भागातील गुणवंत मुलींना विमान वाहतूक क्षेत्रात करिअर घडविता यावे, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. या प्रशिक्षणासंदर्भात १ डिसेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता समाजकल्याण भवन येथे माहिती व मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या प्रशिक्षणासाठी बारावी विज्ञान शाखेत भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित (पीसीएम) विषयांसह किमान ५१ टक्के गुण आवश्यक आहेत. १८ ते ३५ वर्षे वयोगटातील मुलींना या प्रशिक्षणासाठी पात्र ठरण्याची संधी आहे. प्रशिक्षण पूर्णतः मोफत आणि निवासी स्वरूपाचे असेल, जिल्ह्यातील पात्र मुलींनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी केले आहे.
दरम्यान, अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींसाठीही आधुनिक तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण उपलब्ध झाले आहे. महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे आणि आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (टीआरटीआय), पुणे यांच्यात झालेल्या सामंजस्य करारामुळे आदिवासी उमेदवारांना ‘अमृत ड्रोन मिशन’ अंतर्गत ड्रोन पायलट प्रशिक्षण घेता येणार आहे.
शेती, पीक निरीक्षण, फवारणी, जमीन सर्वेक्षण, नकाशांकन आणि पायाभूत सुविधांच्या क्षेत्रात ड्रोनचा वापर वाढत आहे. या पार्श्वभूमीवर उमेदवारांना सैद्धांतिक ज्ञानासह प्रत्यक्ष प्रशिक्षण आणि व्यावसायिक कौशल्ये दिली जाणार आहेत. प्रशिक्षणानंतर नोकरी मिळविण्यासोबतच स्वतःचा ड्रोन सेवा व्यवसाय सुरू करण्याचाही पर्याय उपलब्ध होणार आहे.
या प्रशिक्षणासाठी जागा मर्यादित असून, पात्र अनुसूचित जमातीच्या युवक-युवतींनी लवकर अर्ज करावेत, असे आवाहन टीआरटीआयच्या वतीने निलेश सागर यांनी केले आहे. अधिक माहिती आणि ऑनलाईन अर्जासाठी http://www.amrutdronemission.com या संकेतस्थळाला भेट देता येईल. अवकाशात झेप घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या मुलींपासून ते ड्रोन तंत्रज्ञानाच्या माध्यमातून स्वयंरोजगार उभारू इच्छिणाऱ्या आदिवासी युवकांपर्यंत, या दोन्ही उपक्रमांमुळे गडचिरोलीतील नव्या पिढीसमोर करिअरचे वेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत.

















