मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या निर्णयाचे वारकऱ्यांकडून जोरदार स्वागत
लोकवाहिनी न्यूज:कोल्हापूर : पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात व्हीआयपी दर्शनाला तात्पुरती बंदी घालण्याच्या निर्णय घेतल्यानंतर सर्वसामान्य वारकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर मंदिर प्रशासनाने व्हीआयपी प्रवेश रोखल्याने आता सामान्य भाविकांनाही निवांत आणि जवळून दर्शन घेण्याची संधी मिळत आहे. ‘आज खऱ्या अर्थाने विठ्ठल भेटला,’ अशा भावना वारकरी व्यक्त करत असून या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे. पंढरपूरच्या विठ्ठला हे लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र आहे. सध्या पुरुषोत्तम अर्थात अधिकमास सुरू असल्यामुळे पंढरपुरात दररोज आषाढी वारीसारखी प्रचंड गर्दी होत आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून तसेच देशभरातून लाखो वारकरी विठ्ठलाच्या दर्शनासाठी पंढरपुरात दाखल होत आहेत. अशा परिस्थितीत सर्वसामान्य भाविकांसाठी मोठा दिलासा देणारा निर्णय घेण्यात आला आहे. मंदिरातील व्हीआयपी दर्शन व्यवस्था तात्पुरती बंद करण्यात आल्याने आता सामान्य भक्तांनाही शांतपणे आणि जवळून विठ्ठल दर्शन घेण्याची संधी मिळत आहे. यापूर्वी मंत्री, आमदार, अधिकारी आणि इतर मोठ्या व्यक्तींना मंदिरात विशेष प्रवेश दिला जात होता. नित्यपूजेच्या वेळी देवासमोर बसून दर्शन घेण्याची संधीही त्यांना मिळत असे. मात्र आता हीच संधी सर्वसामान्य वारकऱ्यांना मिळू लागली आहे.
दोन सेकंदांऐवजी आता निवांत दर्शन: दररोज सात ते आठ लाख भाविक दर्शनासाठी येत असल्याने मंदिर परिसरात मोठी गर्दी होत आहे. दर्शनाच्या रांगा अनेक किलोमीटरपर्यंत जात आहेत. आजही विठ्ठल दर्शनाची रांग थेट गोपाळपूरपर्यंत पोहोचल्याचे दिसून आले. मात्र व्हीआयपी लोकांची घुसखोरी थांबल्यामुळे भाविकांना कमी वेळेत दर्शन मिळत असल्याचे वारकरी सांगत आहेत. पूर्वी व्हीआयपी दर्शनामुळे सामान्य भक्तांना तासन्तास थांबावे लागत होते. आता मात्र रांग सुरळीत पुढे सरकत असल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे, नित्य उपचारा दरम्यान जे स्थान पूर्वी फक्त व्हीआयपी लोकांसाठी राखीव असायचे, त्या ठिकाणी आता शेकडो वारकरी बसून विठुरायाचे दर्शन घेत आहेत. ज्या देवासमोर दोन सेकंद उभे राहणेही कठीण होते, त्या विठ्ठलाला आता भाविक वीस-वीस मिनिटे डोळे भरून पाहू शकत आहेत. या अनुभवामुळे अनेक वारकरी भावुक झाले आहेत.
४० वर्षांच्या वारीत पहिल्यांदाच असा अनुभव
एका वारकऱ्याने प्रतिक्रिया देताना सांगितले की, चाळीस वर्षांपासून वारी करतो, पण असा योग कधीच आला नव्हता. आज खऱ्या अर्थाने विठ्ठल भेटला. तर एका महिला भाविकेने सांगितले की, विठ्ठलानेच आम्हाला ही संधी दिली. देवासमोर शांत बसून दर्शन घेण्याचा आनंद शब्दांत सांगता येणार नाही. व्हीआयपी बंदीमुळे काही मोठी मंडळी नाराज झाली असली तरी सर्वसामान्य भाविक मात्र या निर्णयाचे जोरदार स्वागत करत आहेत. मंदिर प्रशासनाच्या या निर्णयामुळे विठ्ठल दर्शन अधिक सुलभ आणि समाधानकारक झाल्याची भावना वारकऱ्यांमध्ये आहे. अनेकांच्या मते, मंदिरात सर्व भक्तांना समान वागणूक मिळणे हीच खरी भक्ती आणि विठ्ठलाची शिकवण आहे. पंढरपुरातला हा निर्णय सध्या राज्यभर चर्चेचा विषय ठरत आहे. सर्वसामान्य भक्तांना प्राधान्य देणाऱ्या या निर्णयामुळे वारकरी वर्गात आनंदाचे वातावरण असून आज खऱ्या अर्थाने विठ्ठल भेटला अशी भावना प्रत्येक भाविक व्यक्त करताना दिसत आहे.













