गडचिरोली-नारायणपूर सीमावर्ती जंगलात पोलिसांची संयुक्त कारवाई
लोकवाहिनी न्यूज:गडचिरोली : गडचिरोली पोलीस आणि छत्तीसगडमधील नारायणपूर पोलिसांनी संयुक्तपणे राबवलेल्या मोठ्या अभियानात महाराष्ट्र-छत्तीसगड सीमावर्ती दुर्गम जंगलात सुरू असलेला माओवाद्यांचा शस्त्रास्त्र निर्मिती कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला. या कारवाईमुळे परिसरातील माओवादी हालचालींना मोठा धक्का बसला आहे.
आत्मसमर्पित माओवाद्यांकडून मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे हे आंतरराज्यीय अभियान राबवण्यात आले. चौकशीदरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, पोस्टे काकूरपासून सुमारे ७ किमी अंतरावर जंगलात माओवाद्यांनी शस्त्रे आणि शस्त्रास्त्रनिर्मिती साहित्य लपवून ठेवले होते. २६ मे रोजी गडचिरोलीचे पोलीस अधीक्षक एम. रमेश यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष अभियान पथक (सी-६०/प्राणहिता), नारायणपूर डीआरजी आणि बीडीडीएस पथकांनी संयुक्त शोध मोहीम सुरू केली. २७ मे रोजी सखोल तपासणीत जमिनीखाली लपवलेला मोठा शस्त्रसाठा व निर्मिती साहित्य आढळले.
जप्त करण्यात आलेल्या साहित्यामध्ये इन्सास रायफल, सिंगल शॉट व १२ बोअर रायफल्स, एसएलआर काडतुसे, मोठ्या प्रमाणात गोळाबारूद, तसेच सुमारे २५ किलो आयईडी स्फोटक, क्लेमोर, डेटोनेटर, कॉर्टेक्स वायर आणि ५०० हून अधिक बीजीएल सेल यांचा समावेश आहे. याशिवाय शस्त्रनिर्मितीसाठी वापरली जाणारी लेथ मशीन, ग्राइंडर, इन्व्हर्टर, सोलर प्लेट्स आणि इतर उपकरणेही जप्त करण्यात आली.
सुरक्षा दलांवर मोठा हल्ला करण्याच्या उद्देशाने हा साठा तयार करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळीच जवानांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सर्व शस्त्रसाठा नष्ट केला. ही संयुक्त कारवाई एम. रमेश, कार्तिक मधिरा, गोकुल राज, हर्षवर्धन बी. जे., विशाल नागरगोजे आणि मनोज मंडावी यांच्या नेतृत्वाखाली यशस्वीरीत्या पार पडली. या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षकांनी सर्व पथकांचे विशेष कौतुक केले आहे.










