अजय देवगणचा बहुप्रतिक्षित ‘दृश्यम ३ : द कन्क्लुजन’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दमदार सुरवात करण्यात यशस्वी ठरला आहे. २ ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने पहिल्याच दिवशी भारतात सह परदेशातही चांगली कमाई केली आहे. चित्रपटाला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून, सोशल मीडियावरही त्याची चर्चा सुरू आहे. आकडेवारीनुसार, ‘दृश्यम ३’ने पहिल्याच दिवशी भारतात १५, ७५९ शोमधून ६६.७५ कोटी रुपयांची नेट कमाई केली. भारतातील चित्रपटाची ग्रॉस कमाई ८०.१० कोटी रुपये झाली आहे. याशिवाय परदेशातील बाजारातून चित्रपटाने सुमारे १५ कोटी रुपयांची ग्रॉस कमाई केली. त्यामुळे पहिल्याच दिवशी चित्रपटाचे जगभातील ग्रॉस कलेक्शन ९५.१० कोटी रुपयांवर पोहोचले आहे.
वीकेंडला या चित्रपटाच्या कमाईत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा चित्रपटाला फायदा मिळू शकतो. त्यामुळे आगामी दोन दिवसांत चित्रपट किती कमाई करतो, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. ‘दृश्यम ३’ने अजय देवगणच्या कोविडनंतरच्या काळातील काही चित्रपटांच्या पहिल्या दिवसाच्या जगभातील कमाईलाही मागे टाकले आहे. या चित्रपटाने ‘मैदान’च्या ७०.२९ कोटी आणि ‘सन ऑफ सरदार २’च्या ६५.३८ कोटी रुपयांच्या कमाईपेक्षा अधिक व्यवसाय केला आहे. वीकेंडनंतर हा चित्रपट अजयच्या आणखी काही चित्रपटांच्या कमाईला मागे टाकण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अभिषेक पाठक यांनी ‘दृश्यम ३’चे दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात अजय देवगणसोबत तब्बू, श्रिया सरन, इशिता दत्तो आणि रजत कपूर यांच्या प्रमुख भूमिका आहेत. याशिवाय जयदीप अहलावत आणि प्रकाश राज यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटातील रहस्य आणि थरार प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत.













