नवी दिल्ली : दुबईहून इस्रायलकडे जाणारे फ्लायदुबईचे विमान दुर्घटनाग्रस्त होण्यापासून वाचवणारे भारतीय कॅप्टन स्मित मच्छार यांच्या कामगिरीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कौतुक केले आहे. पंतप्रधान मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करत कॅप्टन मच्छार यांना ‘हिरो’ संबोधले.
पंतप्रधानांनी सांगितले की, कॅप्टन मच्छार यांच्या धाडसामुळे शेकडो लोकांचे प्राण वाचले आणि मोठी दुर्घटना टळली. अत्यंत धोकादायक परिस्थितीत गंभीर जखमी झालेले असतानाही इतरांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी अदम्य धैर्य आणि अढळ निर्धार दाखवला. भारताला कॅप्टन मच्छार यांचा अभिमान असल्याचे सांगत पंतप्रधानांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कॅप्टन स्मित मच्छार यांची ओळख त्या भारतीय वैमानिकाच्या रुपात झाली आहे, ज्यांनी बुधवारी, ३० सप्टेंबर रोजी फ्लायदुबईच्या विमानाच्या कॉकपीटमध्ये कथितरित्या झालेला विमान अपहरणणाचा प्रयत्न रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. अहवालानुसार, एफझेड-१००३ या विमानाच्या कॉकपीटमध्ये त्यावेळी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली, जेव्हा ओमानमधील एका वैमानिकाने कथितरित्या विमानाचे अपहरण करून ते दुर्घटनाग्रस्त करण्याचा प्रयत्न केला.
यावेळी दोन्ही वैमानिकामध्ये झटापट झाली आणि कॅप्टन मच्छार यांच्यावर चाकूने हल्ला करण्यात आला. त्यात ते गंभीर जखमी झाले. मात्र, जखमी अवस्थेतही त्यांनी कॉकपीटचा दरवाजा उघडण्यात यश मिळवले, त्यामुळे प्रवाशांना कॉकपीटमध्ये पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणण्याची संधी मिळाली.
विमान तेल अवीवमध्ये उतरल्यानंतर प्रवाशांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांना या घटनेची माहिती दिली. प्रवाशांच्या म्हणण्यानुसार, जखमी कॅप्टन मच्छार यांनी कॉकपीटचा दरवाजा उघडला, त्यानंतर प्रवासी आत पोहोचले आणि त्यांनी दुसऱ्या वैमानिकाला ताब्यात घेतले. विमानात आणखी दोन वैमानिक प्रवासी म्हणून प्रवास करत होते. त्यांनी त्यानंतर विमानाचा ताबा घेतला आणि ते सौदी अरेबियाच्या दिशेने वळवून आपत्कालीन लँडिंग केले. अहवालानुसार, या घटनेत जखमी झाल्यानंतर कॅप्टन मच्छार यांच्यावर शस्त्रक्रियाही करण्यात आली.
कॅप्टन स्मित मच्छार जून २०२२ पासून फ्लायदुबईमध्ये कॅप्टन म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी सुमारे ११ वर्षे स्पाइसजेटमध्ये काम केले असून, तिथे त्यांनी वरिष्ठ कमांडर म्हणून जबाबदारी सांभाळली. मच्छार यांनी ‘लाइन ट्रेनिंग कॅप्टन’ म्हणूनही काम केले आहे, या भूमिकेत त्यांनी वैमानिकांना प्रशिक्षण देणे, त्यांना मार्गदर्शन करणे आणि त्यांच्या क्षमतेचे मूल्यांकन करणे यासारख्या जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत. भारतीय वैमानिक स्मित मच्छार यांनी वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंटमधून बॅचलर ऑफ बिजनेस ॲडमिनिस्ट्रेशन (बीबीए) पदवी मिळवली आहे. विमान वाहतूक क्षेत्रातील दीर्घ अनुभवाच्या काळात त्यांनी वैमानिक प्रशिक्षण आणि मार्गदर्शनाशी संबंधित जबाबदाऱ्याही सांभाळल्या आहेत.











