अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता जहीर इक्बाल यांच्या आगामी ‘तू है मेरी किरण’ या चित्रपटाचा फर्स्ट लुक प्रदर्शित झाला आहे. हा चित्रपट रोमँटिक थ्रिलर असून, २३ ऑक्टोबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून सोनाक्षी आणि जहीर पुन्हा एकदा पडद्यावर एकत्र दिसणार आहेत.
चित्रपटाच्या पोस्टरमध्ये सोनाक्षी आणि जहीर यांच्या व्यक्तिरेखांची झलक पाहायला मिळते. पोस्टरवरून चित्रपटात प्रेमासोबतच रहस्य आणि तणावाचे घटक असल्याचे दिसून येते. मात्र, चित्रपटाची संपूर्ण कथा अद्याप निर्मात्यांनी जाहीर केलेली नाही. सोनाक्षी सिन्हाने सोशल मीडियावर चित्रपटाचे प्रमोशनल पोस्टर शेअर केले. पोस्टरसोबत तिने, ‘प्रेम आणि वेड यांच्यात तुम्ही सीमारेषा कुठे आखाल?’ अशी उत्सुकता वाढवणारी टॅगलाइन दिली आहे. तसेच, चित्रपटाच्या पोस्टरवर ‘तिला एक नाते सापडले, त्याला एक वेड लागले,’ असे लिहिले आहे. त्यामुळे चित्रपटात प्रेम आणि वेड यांच्यातील संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. ‘तू है मेरी किरण’चे लेखन आणि दिग्दर्शन करण रावल यांनी केले आहे.
विशाल राणा यांनी इचेलॉन प्रॉडक्शन्सच्या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटातील इतर कलाकार, कथानक आणि निर्मितीशी संबंधित अधिक माहिती अद्याप समोर आलेली नाही. सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इक्बाल यांनी २०२४ मध्ये लग्न केले. लग्नानंतर दोघे पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र दिसणार आहेत. यापूर्वी दोघांनी २०२२ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘डबल एक्सएल’ या विनोदी चित्रपटात एकत्र काम केले होते. आता ‘तू है मेरी किरण’मध्ये त्यांची जोडी रोमँटिक थ्रिलरच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर येणार आहे. चित्रपटाचा फर्स्ट लुक समोर आल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, २३ ऑक्टोबरच्या प्रदर्शनाकडे लक्ष लागले आहे.











