हिंगण्यात भीषण अपघात; मोठा मुलगा गंभीर जखमी
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : कामानिमित्त नागपूरला आलेल्या एका कुटुंबाचा आनंदाचा संसार भरधाव कंटेनरच्या धडकेने क्षणात उद्ध्वस्त झाला. हिंगणा परिसरात कंटेनरने दुचाकीला मागून जोरदार धडक दिल्याने एकाच कुटुंबातील आई, वडील आणि पाच वर्षांच्या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या भीषण अपघातात त्यांचा सात वर्षांचा मुलगाही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेने नाईक कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
हा हृदयद्रावक अपघात ३ ऑक्टोबर रोजी रात्री आठच्या सुमारास नागपूर-बुटीबोरी मार्गावरील मेट्रो पिलर क्रमांक १३५ जवळ, जिमको कंपनी परिसरात घडला. मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील लांजी तालुक्यातील हलभिटोला येथील योगेश सुदामा नाईक (वय ३६), पत्नी सुनिता योगेश नाईक (वय २९) आणि मुले गुलशन उर्फ गोलू (वय ५) व तन्मय (वय ७) हे कामानिमित्त नागपूरमध्ये आले होते.
दिवसभराचे काम आटोपून कुटुंब दुचाकीवरून बिडगणेशपूरच्या दिशेने परत होत होते. याच वेळी मागून आलेल्या भरधाव कंटेनरने त्यांच्या स्पलेंडर मोटरसायकलला जोरदार धडक दिली. धडक इतनी भीषण होती की दुचाकीवरील चौघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. अपघातानंतर कंटेनरचालक घटनास्थालावरून पसार झाला. जखमींना तातडीने एम्स हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले, मात्र, उपचार सुरू असतानाच डॉक्टरांनी योगेश नाईक, सुनिता नाईक आणि त्यांचा अवघ्या पाच वर्षांच्या गुलशनला मृत घोषित केले. कुटुंबातील तिघांचा एकापाठोपाठ मृत्यू झाल्याने नातेवाईकांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दुसरीकडे, सात वर्षांचा तन्मय गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. आई-वडिलांसह भावाला गमावलेल्या या चिमुकल्याच्या अवस्थेने उपस्थितांचेही मन हेलावून गेले.












