नागपूरच्या रस्त्यांवर कोंडीचा साखळा; मेट्रो-उड्डाणपुलांच्या कामांनी भर
प्रसन्न जकाते
नागपूर : सकाळची ልગबन… रस्त्यावर वाहनांची गर्दी… सिग्नलवर वाहनांच्या लांबच लांब रांगा… कुठे मेट्रोचे काम, कुठे उड्डाणपुलाचे काम, तर कुठे रस्त्याच्या कामामुळे अरुंद झालेला मार्ग. अशा परिस्थितीत वाहतूक सुरळीत करण्यासाठी चौकाचौकांत पोलिसांची गरज असताना, नागपूरच्या रस्त्यांवर प्रत्यक्ष मैदानात उतरलेले वाहतूक पोलिस मोजकेच!
नागपूर शहरात तब्बल ३२ लाख वाहनांची नोंद असताना वाहतूक नियंत्रणाची जबाबदारी अवघ्या साडेतीनशे पोलिसांच्या खांद्यावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेवर ताण किती प्रचंड आहे, याची कल्पना यावरून येते. नागपूर शहर वाहतूक विभागाकडे एकूण ६१६ पोलिसांचे मनुष्यबळ आहे, पैकी ५७५ कर्मचारी ग्राउंड लेव्हलवर वाहतूक नियंत्रणाचे काम करतात.
या ५७५ जणांपैकी सुमारे २० टक्के कर्मचारी साप्ताहिक सुटी, रजा आणि कार्यालयीन कामकाजात असतात. त्यामुळे प्रत्यक्ष वाहतूक नियंत्रणासाठी उपलब्ध राहणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या सुमारे ४६० वर येते. उपलब्ध ४६० कर्मचाऱ्यांपैकी सुमारे २० टक्के कर्मचारी व्हीआयपी बंदोबस्त आणि वायरलेस ऑपरेटरसारख्या कामांमध्ये गुंतलेले असतात. परिणामी, शहराच्या रस्त्यावर वाहतूक करण्यासाठी प्रत्यक्षात सुमारे ३५० पोलिस कर्मचारी उतरतात.
कुठे कुठे पळणार पोलिस?
एका बाजूला ३२ लाख वाहनांचा महाकाय लोंढा आणि दुसऱ्या बाजूला त्याला नियंत्रित करण्यासाठी अवघे ३५० हात! शहर वाढले… वाहने वाढली… पण वाहतूक पोलिसांचे गणित बिघडले आहे. नागपूर शहराचा विस्तार झपाट्याने होत आहे, उपनगरमध्ये गर्दी वाढत आहे, वाहनांची संख्या वाढत आहे. मेट्रो, उड्डाणपूल आणि रस्त्याच्या विकासामुळे अनेक प्रमुख मार्गांवर वाहतुकीचा वेग मंदावतो. याच काळात सकाळी ११ वाजेपर्यंत आणि सायंकाळी ५ ते रात्री १० वाजेपर्यंत रस्त्यांवर दुचाकी आणि चारचाकी वाहनांची मोठी गर्दी असते.
ज्या वेळेत वाहतूक नियंत्रणासाठी सर्वाधिक मनुष्यबळाची गरज असते, त्याच वेळेत शहरातील प्रमुख चौक आणि रस्त्यांवर वाहतुकीचा ताण कमालीचा वाढतो. शहरातील एखाद्या महत्त्वाच्या चौकात वाहतूक विस्कळीत झाली, की काही मिनिटांत त्याचा परिणाम आसपासच्या अनेक रस्त्यांवर होतो. एका मार्गावरील कोंडी दुसऱ्या मार्गावर पोहोचते आणि काही सेकंदात संपूर्ण परिसराचा वेग मंदावतो. अशा वेळी प्रत्येक महत्त्वाच्या पॉईंटवर वाहतूक पोलिस तैनात असणे गरजेचे असते. मात्र साडेतीनशे कर्मचाऱ्यांवर नागपूर शहराच्या प्रचंड मोठ्या कार्यक्षेत्राची जबाबदारी असल्याने उपलब्ध मनुष्यबळाचे नियोजन ही मोठी कसरत ठरत आहे.
व्हीआयपी दौऱ्याची डोकेदुखी
नागपूरसारख्या शहरात व्हीआयपी किंवा मोठ्या नेत्यांचा दौरा लागला की, वाहतूक पोलिसांवर बंदोबस्ताची अतिरिक्त जबाबदारी येते.
आधीच मर्यादित असलेले मनुष्यबळ अशा वेळी आणखी विभागले जाते. मग शहरातील वाहतूक कोण संभाळणार? हा प्रश्न केवळ वाहतूक पोलिसांसमोरचा नाही, तर दररोज रस्त्यावर उतरलेल्या लाखो वाहन चालकांसमोरचा आहे, या समीकरणानात वाहतूक कोंडी होणार नाही तरच नवल!
नागपूर स्मार्ट सिटी, मेट्रो आणि पायाभूत सुविधांच्या विकासाकडे वेगाने वाटचाल करत असताना वाहतूक नियंत्रणासाठी आवश्यक मनुष्यबळाचा प्रश्न मात्र तितक्याच वेगाने सोडवला जाणे गरजेचे आहे. अन्यथा रस्ते रुंदावले, उड्डाणपूल उभे राहिले, मेट्रो धावली तरी रस्तवरच्या वाहतुकीचा ताण कमी होण्याऐवजी चौकाचौकांत कोंडीची पुनरावृत्ती होत राहण्याची शक्यता आहे. हा प्रश्न आता केवळ वाहतूक पोलिसांच्या राहिलेला नाही; तो दररोज रस्त्यावर अडकणाऱ्या प्रत्येक नागपूरकराचा प्रश्न बनला आहे












