नागपुरात अखंड पुरवठ्यासाठी महावितरण सज्ज
प्रसन्न जकाते,नागपूर : उत्सवांचा माहौैल आणि लोडशेडिंगचा काळोख असा काळ अनेकांनी पाहिला असेल. परंतु लोडशेडिंग बंद झाल्यापासून काही अपवाद वगळता आता नागपूर शहरात अखंड वीज पुरवठा करण्यात महावितरणला बऱ्यापैकी यश आले आहे. लवकरच उत्सवांना सुरुवात होत आहे. अशात अखंड वीज पुरवठा करण्यासाठी महावितरण सज्ज झाले आहे.
उपराजधानीत आता मारबत, पोळा, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, दिवाळी असे उत्सव साजरा करण्यात येणार आहेत. या सर्व उत्सवांमध्ये रोषणाईला विशेष महत्त्व असते. त्यामुळे विजेची मागणी साहजिकच वाढते. आगामी उत्सवांच्या काळात अखंड वीज पुरवठा राहावा, यासाठी महावितरणने सर्वसाधारणपणे ७०० मेगाव्हॉट विजेची मागणी केली आहे.
विघ्न टळणार
महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, पावसाळा संपत आला आहे. पावसाळा आणि हिवाळा या दोन ऋतूंमध्ये विजेची मागणी सरासरीच्या तुलनेत कमी होते. परंतु, गणेशोत्सवाचे दहा दिवस, नवराтраचे नऊ दिवस आणि दिवाळीत पुन्हा विजेची मागणी काही प्रमाणात वाढते. नागपूर शहरात सद्यःस्थिती अचानक वीज पुरवठा खंडित होण्याचे प्रमाण अर्थात ट्रिपिंग जवळपास शून्य आहे. तांत्रिक बिघाड वगळता अन्य कोणत्याही कारणांमुळे वीज पुरवठा खंडित केला जात नाही.
बचत शक्य
सध्या नागपुरात डीजेच्या आवाजावरून वातावरण ढवळून निघाले होते. त्यामुळे यंदा शहरातील अनेक मंडळांकडून पर्यावरणपूरक आणि ध्वनी प्रदूषणमुक्त गणेशोत्सव साजरा होईल, अशी दाट शक्यता आहे. असे झाल्यास लाऊडस्पीकरसाठी लागणारी विजेची मागणी व खर्चात काही प्रमाणात कपात होऊ शकते, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांना वाटत आहे.
दहीहंडीपासून श्रीगणेशा
अखंड वीजपुरवठ्यासह उत्सवाचा श्रीगणेशा नागपुरात दहीहंडी उत्सवापासून झाला आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार शहर भागात दहीहंडी उत्सवादरम्यान कुठेही वीज पुरवठा खंडित झाल्याची नोंद नाही.










