लोकवाहिनी न्यूज
मालेगाव : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथे साडेचार वर्षांच्या बालकेवर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी आरोपी विजय खैरनार (२४) याला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. जलदगती न्यायालयाचे न्यायमूर्ती के.जी. पालदेवार यांनी शुक्रवारी हा निकाल दिला. या घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त करण्यात आला होता. निकालाच्या वेळी न्यायालया परिसर नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
न्यायालयाने ३० सप्टेंबर रोजी विजय खैरनार याला बालकेचे अपहरण, लैंगिक अत्याचार आणि हत्या केल्याच्या आरोपांमध्ये दोषी ठरवले होते. त्यानंतर ७ ऑक्टोबर रोजी झालेल्या अंतिम सुनावणीत दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. शुक्रवारी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. गेल्या वर्षी १६ नोव्हेंबर रोजी डोंगराळे गावातून साडेचार वर्षांच्या बालकेचे अपहरण करण्यात आले होते. त्यानंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या अमानुष घटनेची माहिती समोर आल्यानंतर राज्यभरात संताप व्यक्त करण्यात आला, आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी नागरिकांडून करण्यात येत होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. अवघ्या काही तासांत पोलिसांनी गावातीलच विजय खैरनार याला अटक केली. त्यानंतर तीन आठवड्यांच्या आत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले. गेल्या ११ महिन्यांपासून या प्रकरणाची सुनावणी जलदगती न्यायालयात सुरू होती.
या खटल्यात राज्य सरकारने ज्येष्ठ विधिज्ञ ॲड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली होती. त्यांनी न्यायालयात आरोपीविरोधात प्रभावी युक्तिवाद केला. त्यांना ॲड. संजय सोनवणे, ॲड. स्नेहा शर्मा-ठाकरे आणि ॲड. हर्षल तिवारी यांनी सहकार्य केले. सरकारी पक्षाने या खटल्यात एकूण २४ साक्षीदारांची साक्ष नोंदवली. आरोपीला अटक झाल्यापासून तो कारागृहात होता. सुरक्षेच्या कारणास्तव त्याला प्रत्येक सुनावणीला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यात येत होते. शुक्रवारी अंतिम निकालाच्या वेळीही त्याला याच पद्धतीने हजर करण्यात आले.
न्यायालयाने लैंगिक अत्याचार आणि हत्या केल्याप्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. तसेच अपहरण आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी प्रत्येकी सात वर्षांचा सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंड अशी शिक्षाही सुनावली. निकालाच्या पार्श्वभूमीवर मालेगाव न्यायलय परिसर सकाळपासूनच मोठी गर्दी झाली होती. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निकाल जाहीर झाला, तेव्हा विशेष सरकारी वकील ॲड. उज्ज्वल निकम आणि शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे हेही न्यायालयात उपस्थित होते.













