नात्यांमधील प्रेम, जिव्हाळा आणि भावनात्मक गुंतागुंत दाखवणारा ‘बंधू’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ग्रामीण महाराष्ट्रातील एका छोट्या शेतकरी कुटुंबाची कथा या चित्रपटातून मांडण्यात आली आहे, अभिनेता उपेंद्र लिमये आणि जितेन्द्र जोशी दोन भावांच्या भूमिकेत दिसणार असून, अभिनेत्री मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे त्यांच्या पत्नींच्या भूमिका साकारणार आहेत. हा चित्रपट २० नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे.
उपेंद्र लिमये, जितेन्द्र जोशी, मिताली जगताप आणि मृण्मयी देशपांडे हे चारही कलाकार आपल्या अभिनयासाठी ओळखले जातात. आता ‘बंधू’च्या माध्यमातून हे कलाकार एकत्र काम करताना दिसणार आहेत. चित्रपटातील दोन जोड्यांमधील नातेसंबंध, त्यांच्यातील भावना आणि कौटुंबिक आयुष्यातील विविध प्रसंगी कथेला महत्त्वाचे वळण देणार आहेत. या कलाकारांच्या अभिनयातून नात्यांचे वेगवेगळे पैलू प्रेक्षकांसमोर येणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती जेएसडी स्टुडिओ आणि ट्राईफ्लक्स एंटरटेनमेंट यांनी संयुक्तपणे केली आहे. रजत बेदी हे या चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते आहेत. प्रणव देसाई, जुही देसाई आणि कुलदीप सुनील ओझा यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे.
चित्रपटाचे लेखन, संवाद आणि दिग्दर्शन नितीन सिंधुविजय सुपेकर यांनी केले आहे. यापूर्वी ‘आटपाडी नाईट्स’ आणि ‘सरला एक कोटी’ या चित्रपटांमधून नितीन सुपेकर यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे त्यांच्या आगामी ‘बंधू’ चित्रपटाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्सुकता आहे. चित्रपटातील कलाकारांनीही एकत्र काम करण्याचा अनुभव खास असल्याचे सांगितले. कौटुंबिक नात्यामधील भावना आणि त्यांचे विविध पैलू पडद्यावर साकारताना वेगळे समाधान मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.













