लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूर व परिसरात मेंटेनन्स कमांड, ऑटो एव्हिएशन आणि डिफेन्स एव्हिएशन मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात मोठी गुंतवणूक होत आहे. या उद्योगांसह कृषी, पर्यटन आदींच्या विकासाला गती मिळून डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळ हे नागपूर, विदर्भ आणि मध्य भारतातील आर्थिक विकासाचे इंजिन म्हणून नावारूपाला येईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे व्यक्त केला.
नागरी विमान वाहतूक मंत्री किंजारापू राममोहन नायडू, केंद्रीय रस्ते विकास व महामार्गमंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळ परिसरात आयोजित विमानतळ हस्तांतरण कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशात नवनवीन विमानतळ उभारले जात असताना नागपूर विमानतळ मोठे व सुंदर करण्याचा आमचा संकल्प केला. २०१८ मध्ये यासंदर्भात निविदा काढण्यात आल्या. २०१९ मध्ये जीएमआर कंपनी पात्र ठरली होती. मात्र या संदर्भात उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्या आणि अखेर सकारात्मक निर्णय आला. केंद्राकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाला पूर्ण पाठिंबा दिला व केंद्रीय मंत्रिमंडळाने या प्रकल्पास मंजुरी दिली आणि आज रीतसरपणे या विमानतळाच्या आधुनिकीकरण, विस्तार आणि विकासाच्यादृष्टीने जीएमआर कंपनीला विमानतळ हस्तांतरण करण्यात आले.
या विमानतळावर प्रवासी व कार्गो वाहतूक होण्यासाठी दोन टर्मिनल आणि दोन धावपट्ट्या होणे गरजेचे आहे. हस्तांतरणामुळे आता हा मार्ग मोकळा झाला आहे. या विमानतळाला मेट्रो ट्रेन आणि रस्त्यांची उत्तम कनेक्टिव्हिटी देण्यात आली आहे. विमानतळाचा विस्तार लक्षात घेऊन येत्या काळात सुयोग्य कनेक्टिव्हिटी देण्याच्या दिशेनेही समांतर कार्य सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
नागपूर व परिसर आणि विदर्भात होत असलेला उद्योग क्षेत्राचा विकास शेजारील तेलंगणा, छत्तीसगड व मध्य प्रदेश या राज्यांनाही मोठा फायदा होऊन या भागाच्या आर्थिक विकासासाठी हे विमानतळ महत्त्वपूर्ण ठरेल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले.
ततपूर्वी, जीएमआरचे व्यावसायिक चेअरमन जी.बी.एस. राजू आणि मिहान इंडिया लिमिटेडचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक डॉ. विपिन इनकर यांनी राममोहन नायडू, नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विशेष उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर विमानतळाचे हस्तांतरण केले.
२०३० पर्यंतची वाट बघू नका
येत्या एक वर्षात या विमानतळावर येणाऱ्या प्रवाशाला येथील सौंदर्य आणि सुविधेत अभूतपूर्व बदल दिसावा असे काम व्हावे. २०३० पर्यंतची वाट बघू नका. जीएमआरने सादरीकरणात दुसरा टप्पा २०३० पर्यंत पूर्ण करण्याचे लिहिले आहे, पण हे आम्हाला अजिबात चालणार नाही. आमचे राजकीय जीवन पाच वर्षांचे असते. त्यामुळे हा प्रकल्प आमच्या याच राजकीय कारकीर्दीत म्हणजे २०२९ मध्ये पूर्ण झाला पाहिजे, अशी आमची आग्रही इच्छा आहे. राज्य शासनाकडून मिहान आणि एमआयडीसी अंतर्गत जागा उपलब्ध करून देण्यात येईल व आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.













