अधिक मशिनरीचा वापर करण्याचे दिले निर्देश
लोकवाहिनी न्यूज,नागपूर : शहरातील ऐतिहासिक अंबाझरी तलावाला पडलेला जलपर्णींचा विळखा आणि तेथील सद्यस्थितीची पाहणी करण्यासाठी महापौर नीता ठाकरे यांनी गुरुवारी अंबाझरी तलाव परिसराची पाहणी केली. तलावातील जलपर्णीमुळे होणारे जल प्रदूषण आणि नैसर्गिक हानी टाळण्यासाठी महापौरांनी प्रशासनाला अधिक प्रमाणात मशिनरी लावून स्वच्छता मोहीम अधिक तीव्र करण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच पावसाळ्यापूर्वी जलपर्णी काढण्यासाठी सर्वोपरी प्रयत्न करण्याच्या सूचना केल्या.
या पाहणी दौऱ्याप्रसंगी उपमहापौर लीला हाथीबेड, स्थायी समिती सभापती शिवानी दानी-वखरे आणि मनपा आयुक्त डॉ. विपीन इटनकर उपस्थित होते. महापौरांनी जलपर्णी काढण्याच्या कामाचा आढावा घेऊन कामात गती आणण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. सध्या तलावाच्या सुमारे ७ ते ८ एकर परिसरातील जलपर्णी काढण्यात यश आले असून, उर्वरित भागासाठी कामाचा वेग वाढवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याकरिता ४ पोकलेन, १ जे सी बी आणि तीन टिप्पर सध्याची परिस्थितीत कार्यरत आहे.
आयुक्त डॉ. इटनकर यांनी तलावात कार्यरत पोकलेनची संख्या वाढवून सहा करण्याचे निर्देश दिले. तसेच तिथे निघालेली जलपर्णीला दुसरीकडे नेण्याचे निर्देशीत केले. त्यांनी सांगितले की, वाडी नगर परिषदचे सिव्हरेज ट्रीटमेंट प्लांटचे काम यावर्षी पूर्ण होणार असून, त्यामधून येणारे सांड पाणी स्वच्छ होऊन अंबाझरी तलावात येईल. तसेच सध्या सुद्धा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मनपातर्फे अंबाझरीमध्ये येणाऱ्या सांड पाण्याला रोखण्यासाठी एक मुरुमाचा तात्पुरता बंधारा तयार करण्यात आला असून, यामुळे जलपर्णींचा विळखा कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
यावेळी स्थानिक नगरसेवक योगेश पाचपोरे, विजय होले, वर्षा चौधरी, अधीक्षक अभियंता डॉ. श्वेता बॅनर्जी, सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंता राजेश दुफारे, कार्यकारी अभियंता मनोज गद्रे, घनकचरा व्यवस्थापन विभाग प्रमुख डॉ. गजेंद्र महल्ले आणि झोनल स्वच्छता अधिकारी लोकेश वासनवार यांच्यासह मनपाचे इतर अधिकारी उपस्थित होते. ■








