सीआयडीच्या पाठपुराव्यानंतरही आरएफएसएलचा अहवाल रखडला
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : राम जुल्यावर भरधाव वेगात कार चालवून दोघांच्या मृत्यूला कारणीभूत ठरलेल्या रितू मालू प्रकरणातील रासायनिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजचे अहवाल अद्याप न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडून (आरएफएसएल) न्यायालयाला प्राप्त झालेले नाहीत. सीआयडीकडून सातत्याने पाठपुरावा करूनही अहवाल उपलब्ध करून देण्यात आले नसल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. त्यामुळे आरएफएसएल, नागपूरमधील संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांना दोन्ही अहवाल १ नोव्हेंबरपर्यंत न्यायालयात सादर करण्याचे आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले.
जिल्हा व सत्र न्यायाधीश ब्रह्मानंद धनुरे यांच्यासमक्ष या प्रकरणाची सुनावणी झाली. २४ फेब्रुवारी २०२४ रोजी रात्री रामझुल्यावर हा अपघात झाला होता. रितू मालू आणि माधुरी शिशिर सारडा या सीपी क्लबमधून बाहेर पडल्यानंतर मर्सिडीज कारने जयस्तंभ चौकातून मेयो रुग्णालय चौकाच्या दिशेने जात होत्या. रितू मालू कार चालवत होत्या. त्यांच्या एमएच-४९-एस-६१११ क्रमांकाच्या मर्सिडीज कारने एमएच-३७-क्यू-२९४८ क्रमांकाच्या दुचाकीला धडक दिली. या दुर्घटनेत मो. हुसैन गुलाम मुस्तफा (३४) आणि मो. आतिफ मो. जिया (३२) यांचा मृत्यू झाला. सरकारी पक्षाने फौजदारी अर्ज दाखल करून रासायनिक विश्लेषण तसेच सीसीटीव्ही फुटेजचे अहवाल आरएफएसएलकडून मागविण्याचे निर्देश देण्याची विनंती केली होती.
हे अहवाल उपलब्ध नसल्याने खटल्यातील पुढील कार्यवाहीवर परिणाम होत असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सीआयडीच्या अधिकाऱ्यांनी आरएफएसएल प्राधिकरणाकडे अहवाल उपलब्ध करून देण्याची विनंती केली होती. मात्र, त्याकडे संबंधित प्राधिकरणाने अपेक्षित लक्ष दिले नसल्याचे न्यायालयाने नोंदविले. प्रयोगशाळेचे अहवाल प्रलंबित असल्याच्या कारणास्तव पुराव्याची कार्यवाही अनिश्चित काळासाठी पुढे ढकलता येणार नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले. खटल्याची सुनावणी सुरळीतपणे पार पाडण्यासाठी हे अहवाल न्यायालयीन अभिलेखावर येणे आवश्यक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. तसेच, अहवाल बचाव पक्षासाठीही महत्त्वाचे ठरणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे रासायनिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजचे अहवाल शक्य तितक्या लवकर, मात्र कोणत्याही परिस्थितीत १ नोव्हेंबरपर्यंत सादर करावेत, असे निर्देश आरएफएसएल, नागपूर आणि संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
अहवालांमुळे पुढील सुनावणीला गती
या प्रकरणी तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. रितिका उर्फ रितू मालू, दिनेश बजरंगलाल मालू आणि माधुरी शिशिर सारडा यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता तसेच मोटार वाहन अधिनियमातील विविध कलमांनुसार आरोप निश्चित करण्यात आले आहेत. आरएफएसएलचे रासायनिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेजचे अहवाल न्यायालयात दाखल झाल्यानंतर खटल्यातील पुढील कार्यवाहीला गती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, अपघातात मृत झालेल्या दोन्ही तरुणांचे शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनाही समन्स बजावून न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.













