लोकवाहिनी न्यूज
मुंबई : नीट पेपरफुटीच्या मुद्द्याची शाई अजून वाळली नसतानाच महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ जून रोजी राज्यभरात आयोजित करण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ (टीईटी) या परीक्षेचा पेपर फुटल्याचा प्रकार उघडकीस आल्याने नियोजित परीक्षा पुढे ढकलण्यात आल्याचे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २८ जून २०२६ रोजी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात एकूण १०२८ केंद्रावर शिक्षक पात्रता परीक्षा २०२६ (टीईटी) घेण्याचे प्रस्तावित होते. नीट २०२६ च्या परीक्षेमधील गैरप्रकार लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने सुरक्षिततेच्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या होत्या. तथापि, आज, २७ जूनला पहाटेच्या सुमारास गोपनीय माहितीच्या आधारे भिवंडी येथे काही इसमांकडे या प्रश्नपत्रिकेबद्दल माहिती असल्याचे समजल्याने भिवंडी पोलिसांनी धाड घालून पडताळणी केली असता, सदर इसमांकडे शिक्षक पात्रता परीक्षेच्या जून २०२६ परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील काही प्रश्न समान असल्याचे आढळून आले. याबाबत भिवंडी पोलिसात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती परीक्षा परिषदेने दिली.
या पेपरफुटीमुळे २८ जून, २०२६ रोजी आयोजित करण्यात आलेली शिक्षक पात्रता पुढे ढकलण्यात आली आहे. कोणत्याही परिस्थितीत परीक्षा पूर्ण पारदर्शकपणे व्हावी हा परीक्षा परिषदेचा आग्रह असल्याने व याबाबत सखोल चौकशी होणे गरजेचे वाटत असल्याने ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे. शिक्षक पात्रता परीक्षेबाबत अद्ययावत माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात येईल, असे परीक्षा परिषदेने स्पष्ट केले आहे. टीईटी परीक्षेत गैरप्रकार होण्याची घटना यापूर्वी घडल्या होत्या. २०१८ आणि २०१९ मध्ये झालेल्या परीक्षेत काही उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे उघडकीस आले होते. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करून काहींना अटक केली होती.
प्रश्नपत्रिका दीड कोटींना विकली जाणार होती
ठाणे – महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत २८ जूनला होणाऱ्या शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका तब्बल दीड कोटी रुपयांना विकली जाणार होती, अशी धक्कादायक माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक दुधे यांनी भिवंडी येथे पत्रकार परिषदेत दिली. या प्रकरणी तीन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना भिवंडीतील कोनगाव परिसरातून ताब्यात घेण्यात आले आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या तीन आरोपींपैकी एक आरोपी हरियाणाचा तर दोन आरोपी बिहारचे रहिवासी आहेत. हे तिघेही दिल्लीहून महाराष्ट्रात आले होते. प्राथमिक तपासात त्यांनी टीईटीची प्रश्नपत्रिका विक्रीसाठी आणल्याचे समोर आले असून, त्यासाठी दीड कोटी रुपयांची मागणी करण्यात आली होती. मात्र हा व्यवहार पूर्ण होण्यापूर्वी पोलिसांनी कारवाई करत आरोपींना जेरबंद केले. या कारवाईदरम्यान संशयितांकडून प्रश्नपत्रिकेशी संबंधित कागदपत्रे आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका नेमकी कुठून मिळाली, ती कोणाकडून आरोपींपर्यंत पोहोचली आणि ती नेमकी कोणाला विकली जाणार होती, याचा सध्या सखोल तपास सुरू असल्याचे दुधे यांनी सांगितले.
टीईटी पेपरफुटीतील सूत्रधारांवर मकोका लावावा : एकनाथ शिंदे
टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत संतापजनक असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधार आणि आरोपींवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मकोका) कारवाई करण्यासाठी आपण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी सविस्तर चर्चा करणार असल्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. या प्रकरणाची सखोल, निष्पक्ष आणि अत्यंत कठोर चौकशी केली जाईल. दोषी कोणत्याही पदावरील असो किंवा कोणत्याही संघटित टोळीचा भाग असो, त्याला कोणतीही सवलत दिली जाणार नाही. संबंधितांवर कायद्यानुसार कठोरत कठोर कारवाई करण्यात येईल.











