लोकवाहिनी न्यूज नागपूर : सोन्याच्या दराने यंदा उच्चांक गाठल्यानंतर आता मोठी घसरण नोंदवली आहे. जीएसटीसह प्रतिदहा ग्रॅमसाठी सुमारे एक लाख ९० हजार रुपयांपर्यंत पोहोचलेले सोन्याचे भाव आता एक लाख २० हजार रुपयांच्या आसपास आले आहेत. विशेषतः सातत्याने वधारणाऱ्या दरांमुळे खरेदी पुढे ढकलणाऱ्या मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांना यामुळे दिलासा मिळाला आहे. मात्र, सोन्याचे भाव आणखी घसरणार की पुन्हा नवा उच्चांक गाठणार, याबाबत उत्सुकता आहे.
अमेरिकेतील महागाईमुळे तेथील मध्यवर्ती बँक डिसेंबरमध्ये व्याजदर वाढवू शकते, अशी बाजारात चर्चा आहे. व्याजदर वाढल्यास सोन्यातील गुंतवणुकीचे आकर्षण कमी होते. कारण सोन्यातून व्याजाच्या स्वरूपात उत्पन्न मिळत नाही. याशिवाय आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर मजबूत झाल्याने सोन्याच्या किमतींवर दबाव येत आहे. मागील काही महिन्यांत सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे अनेक गुंतवणूकदारांनी नफावसुली केली आहे. अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेचे मजबूत आकडे आणि सोन्याच्या महत्त्वाच्या किमतींचे स्तर तुटल्याने व्यवहार करणाऱ्या गुंतवणूकदारांनीही आपली गुंतवणूक कमी केली. या सर्व कारणांचा एकत्रित परिणाम सोन्याच्या दरातील घसरणीवर झाला आहे.
सोन्याचा सर्वोच्च किंवा सर्वात कमी दर नेमका कोणता असेल, याचा अंदाज बांधणे कोणालाही शक्य नाही. सध्याचे दर तुलनेने खालच्या पातळीवर आहेत. त्यामुळे अल्पकालीन काळात दरांमध्ये चढ-उतार होऊ शकतात. आंतरराष्ट्रीय बाजारातही मोठी घसरण झाली असली, तरी येथून पुढे दर आणखी कमी होणार नाहीत, असे ठामपणे सांगता येणार नाही. मात्र, दीर्घकालीन गुंतवणुकीच्या दृष्टीने सोन्याचे महत्त्व आणि विश्वासार्हता कायम आहे. सध्याच्या दरांवर ग्राहकांना खरेदीची चांगली संधी उपलब्ध झाली आहे.
यंदाच्या लग्नसराईत देशभरात सुमारे ५२ लाख विवाह होण्याचा अंदाज आहे. दिवाळीनंतर सोन्याचे दर घसरल्याने ग्राहकांना जणू दिवाळीची भेट मिळाली आहे. त्याचा परिणाम बाजारातील खरेदीवर दिसू लागला आहे. विशेषतः मध्यमवर्गीय आणि निम्न मध्यमवर्गीय कुटुंबांना सोन्याचे दागिने खरेदी करणे पुन्हा आवाक्यात आले आहे. त्यामुळे लग्नसराईत सोन्याच्या खरेदीला चालना मिळण्याची शक्यता आहे. याशिवाय लग्नाचा वाढदिवस आणि अन्य कौटुंबिक समारंभांच्या निमित्तानेही अनेक कुटुंबे सोन्याची खरेदी करतात. त्यामुळे बाजारातील मागणी टिकून राहण्यास मदत होत आहे.
सोन्याची खरेदी केवळ पारंपरिक ग्राहकांपुरती मर्यादित राहिलेली नाही. नव्या पिढीतील तरुणही दागिने आणि सोन्यातील गुंतवणुकीकडे आकर्षित होत आहेत. विशेषतः जनरेशन झेडमधील तरुणांचा दागिन्यांकडे वळता कल बाजारासाठी सकारात्मक आहे. लग्नसराईत अन्य खर्चांमध्ये काही प्रमाणात कपात करून दागिन्यांच्या खरेदीला प्राधान्य देण्याची प्रवृत्तीही दिसत आहे. त्यामुळे सोन्याची मागणी कायम राहण्याची शक्यता आहे. सध्याच्या दरांवर खरेदीची संधी असली, तरी ग्राहकांनी एकदम वेळी संपूर्ण रकमेचे सोने खरेदी करण्याऐवजी वेगवेगळ्या टप्प्यांत थोडेथोडे सोने खरेदी करावे. त्यामुळे वेगवेगळ्या दरांचा सरासरी भाव मिळण्यास मदत होईल आणि दरांमधील चढ-उतारांचा धोका काही प्रमाणात कमी करता येईल.
सोन्याला पुन्हा झळाळी येईल यंदा जीएसटीसह प्रतिदहा ग्रॅमसाठी सुमारे एक लाख ९० हजार रुपयांपर्यंत पोहोचलेले दर आता एक लाख २० हजारांच्या आसपास आले आहेत. त्यामुळे सध्याची घसरण ग्राहकांसाठी महत्त्वाची संधी ठरू शकते. सोन्याला पुन्हा झळाळी येईल. आगामी काळात सोने पुन्हा नव्या उच्चांकांच्या दिशेने वाटचाल करेल, अशी सोने बाजारात चर्चा आहे.
















