भारतीय संविधान जगात सर्वश्रेष्ठ : जिल्हाधिकारी
लोकवाहिनी न्यूजनागपूर : भारतीय संविधानाने देशातील प्रत्येक नागरिकाला मूलभूत हक्क, कर्तव्ये आणि अधिकार प्रदान केले असून, संविधानाचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. जगातील प्रत्येक देशाचे स्वतःचे संविधान आहे. मात्र सर्व देशांच्या संविधानांमध्ये भारताचे संविधान सर्वश्रेष्ठ आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी केले.
भारतीय संविधानाचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या महान संविधानाच्या गौरवशाली परंपरेचे स्मरण करण्यासाठी संविधान दिनानिमित्त २६ नोव्हेंबर रोजी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालयाच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद उद्घाटनपर भाषणात बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, भारतीय संविधानामध्ये अशी कोणतीही घटना किंवा परिस्थिति नाही ज्याबद्दल विचार करण्यात आलेला नाही. आज जग बदलत असून अनेक मोठमोठी संकटे समोर येत आहेत. मात्र देशात कोणतीही कठीण परिस्थिति निर्माण झाली तरी त्यावर मात करण्याचे मार्ग संविधानात आहेत. संविधानाने प्रत्येक व्यक्तीला हक्क आणि कर्तव्ये दिली आहेत. या हक्कांचे आणि अधिकारांचे पूर्णपणे पालन करून संविधानाचे संरक्षण करणे आवश्यक आहे. प्रत्येक नागरिकाने संविधानाचे प्रामाणिकपणे पालन केल्यास देश अधिक सुरक्षित आणि सक्षम होईल.
दीक्षाभूमीवर संविधान प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन
नागपूर : संविधानदिनानिमित्त दीक्षाभूमीसह शहरातील विविध ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून संविधानाप्रती निष्ठा व्यक्त करण्यात आली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती, दीक्षाभूमी आणि अखिल भारतीय धम्मसेना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात दीक्षाभूमी येथील संविधान स्तंभाजवळ संविधानाच्या प्रास्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. स्मारक समितीचे अध्यक्ष तथा धम्मसेना नायक भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी त्यांनी उपस्थितांना संविधानाचे पालन आणि संरक्षण करण्याची शपथ दिली. दीक्षाभूमी येथे भदंत ससाई यांच्या उपस्थितीत बुद्धवंदना घेण्यात आली. तथागत गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करण्यात आले. तसेच स्तूपाच्या आतील भागात बाबासाहेबांच्या अस्थिकलशस वंदन करण्यात आले.
संविधानाच्या रक्षणासाठी ‘रक्षा’ मार्च
नागपूर : भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला दिलेले अधिकार, सन्मान, स्वातंत्र्य आणि समानतेची हमी जपण्यासाठी संविधान दिनानिमित्त नागपुरात ‘संविधान रक्षा’ मार्चचे आयोजन करण्यात आले. माजी मंत्री तथा उत्तर नागपूरचे आमदार डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनात हा मार्च काढण्यात आला. मार्चची सुरुवात विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यापासून, इंदोरा ते भीम चौक, जरीपटका इथपर्यंत झाली. संविधानाचे महत्त्व, लोकशाही मूल्यांचे संरक्षण आणि प्रत्येक नागरिकाच्या हक्कांविषयी जनजागृती करण्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला. यावेळी डॉ. नितीन राऊत यांनी संविधानाचे महत्त्व आणि मतदानाच्या अधिकाराच्या संरक्षणाबाबत आपले मत व्यक्त करताना सांगितले की, भारतीय संविधान हे प्रत्येक नागरिकाच्या अधिकारांची, सन्मानाची आणि समानतेची हमी देणारे आहे. संविधानाचे रक्षण करण्यासाठी तसेच प्रत्येक भारतीयाच्या मतदानाच्या अधिकाराचे आणि त्या अधिकाराच्या सन्मानाचे संरक्षण करण्यासाठी आमचा संघर्ष सदैव सुरू राहील.
विद्युत भवन येथे प्रास्ताविकेचे वाचन
नागपूर : भारतीय संविधानाचा गौरवशाली वारसा आणि मूल्ये जपण्याच्या उद्देशाने, संविधान दिनानिमित्त महावितरणच्या नागपूर परिमंडळातील विद्युत भवन कार्यालयात संविधानाच्या प्रास्ताविकेचे जाहीर वाचन मोठ्या उत्साहात पार पडले. नागपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी त्यांनी उपस्थितांना संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करवले. या प्रसंगी अधीक्षक अभियंता अमित परांजपे, राकेश जनबंधू, कार्यकारी अभियंता नारायण लोखंडे, जयंत खिरकर यांच्यासह विविध स्तरांतील अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

















